देवगड : १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी, उपचार व समुपदेशन सेवा याबाबत स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येत असून या उपक्रमाच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालय देवगड येथे गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्व रोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे, याचा गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश पाटोदेकर यांनी केले आहे.
सदर शिबिरामध्ये स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, दंत शल्यचिकित्सक, मानसोपचार तज्ञ, अस्थिरोग तज्ञ तसेच सर्जन उपस्थित राहणार आहेत. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, रक्तक्षय, क्षयरोग, कोलेस्ट्रॉल, लिव्हर व किडनीसंबंधी तपासणी, कर्करोग तपासणी तसेच मानसिक स्वास्थ्य, किशोरवयीन स्वास्थ्य व पोषक आहार या विषयांवर समुपदेशन सुविधा उपलब्ध असणार आहेत.
यासोबतच नागरिकांचे वय वंदना कार्ड व आयुष्मान कार्ड काढण्याची सुविधाही शिबिरात उपलब्ध असेल. तसेच नेत्रदान व अवयवदान करू इच्छिणाऱ्यांसाठी नोंदणी फॉर्मही दिले जाणार आहेत.
सर्व महिलांनी व बालकांनी या शिबिराला उपस्थित राहून उपलब्ध सेवांचा लाभ घ्यावा, असे डॉ. पाटोदेकर यांनी आवाहन केले आहे.












