कणकवली :
कणकवली शहरानजीक असलेल्या वागदे गावातील टेम्बवाडीमधील प्रदीप शांताराम भोगले यांचे घर चोरांनी फोडले. याबाबत प्रदीप भोगले यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरफोडी करून चोरांनी बाथरूम मधील नळ आणि पितळी कडी कोयंडा असा एकूण 1 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल चोरला आहे. त्यामुळे घरफोडी करून चोरट्यांची निराशा झाली असेच म्हणावे लागेल. प्रदीप भोगले यांचे वागदे टेम्बवाडी येथे दुमजली घर आहे. तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू असून भोगले दाम्पत्य राहतात.
गुरुवार 18 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता भोगले आपल्या घराचा तळमजला कुलूपबंद करून पहिल्या मजल्यावर गेले. शुक्रवारी 19 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजता प्रदीप यांना पहिल्या मजल्यावरील दरवाजाला बाहेरून कडी घातल्याचे लक्षात आले.भोगले यांनी आपल्या नातेवाईकांना घरी बोलावल्यानंतर नातेवाईकांनी दरवाजाची बाहेरून लावलेली कडी काढली. त्यानंतर भोगले यांनी तळमजल्यावर जाऊन पाहिले असता दरवाजाचे कुलूप तोडलेले होते. घरातील बाथरूम मधील दोन नळ, दरवाजाचा पितळी कडी कोयंडा चोरीस गेल्याचे दिसून आले. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे करत आहेत.












