पिकुळे येथील बंद रस्ता खुला करण्याचे आश्वासन.

लवू नाईक यांचे उपोषण स्थगित तहसीलदार यांचे आश्वासन

​दोडामार्ग: प्रतिनिधी

पिकुळे, शेळपीवाडी येथील पिढ्यानपिढ्या वापरला जाणारा रस्ता बंद केल्यामुळे तो पुन्हा खुला करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते लवू रामा नाईक यांनी सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले. प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी मागण्यांवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण थांबवण्यात आले.

​काय आहे प्रकरण?

​पिकुळे येथील गट क्रमांक २१४ मधील मसनवट (०.३९ हे.) या शासकीय जमिनीवर काही लोकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप लवू नाईक यांनी केला होता. तसेच, या भागातील रहदारीसाठी वापरला जाणारा सार्वजनिक रस्ता २७ जुलै २०२४ रोजी एका व्यक्तीने जबरदस्तीने बंद केल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले होते. या संदर्भात ग्रामसभा, तंटामुक्ती बैठक आणि ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत रस्ता पुन्हा खुला करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, तरीही ग्रामपंचायतीने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप नाईक यांनी केला.
​उपोषण आणि प्रशासनाची भूमिका
​ग्रामपंचायतीकडून प्रतिसाद न मिळाल्याने लवू नाईक यांनी धर्मा नाईक आणि राजू नाईक यांच्यासह बुधवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. मात्र, प्रशासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही, त्यामुळे तिसऱ्या दिवशी लवू नाईक यांची प्रकृती खालावली. साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला, पण न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

​प्रशासनाचे लेखी आश्वासन

​उपोषणामुळे प्रशासनावर दबाव वाढला. अखेर प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी उपोषणस्थळी भेट देऊन नाईक यांच्याशी चर्चा केली. शासन निर्णयानुसार त्यांच्या मागण्यांवर योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर लवू नाईक यांनी आपले उपोषण तात्पुरते मागे घेतले. या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.