रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसी परिसरातील ई-६९ या प्लॉटवर सुरू असलेल्या देहविक्रीच्या धक्कादायक प्रकरणात आज मोठी कारवाई झाली. या प्रकरणात मुख्य संशयित नेपाळी महिलेनंतर आता प्लॉट मालक सुनिलकुमार गणपत प्रभू (वय ६०) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुवारी साडेदहाच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकून नेपाळी महिलेला ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्यानंतर, औद्योगिक वापरासाठी खरेदी केलेल्या या भूखंडावर अवैध व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने, आज प्रभूंना अटक करून पुढील चौकशी सुरू करण्यात आली आहे.
या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या नेपाळी महिलेची व तिच्या संपर्कातील लोकांची कसून चौकशी सुरू असून, पोलिसांनी अजून काही महत्त्वाच्या व्यक्तींवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली आहे.













