जयगड तिहेरी हत्याकांड : सहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली, अन्य दोन कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू

रत्नागिरी | प्रतिनिधी : जयगड परिसरात घडलेल्या तिहेरी हत्याकांडाच्या प्रकरणात पोलिसांकडून झालेल्या हलगर्जीपणाचा आरोप सिद्ध झाल्यानंतर जयगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पाटील यांची बदली करण्यात आली. आता या प्रकरणात इतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांचीही पोलीस दलाकडून चौकशी सुरू असून, दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी निष्काळजीपणा केल्याचा आरोप सोशल मीडियावर करण्यात येत होता. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दोषींवर कारवाई केली जाईल असे सांगितले होते. त्या वक्तव्यानंतरच बदलीची कारवाई पार पडली. या संपूर्ण तपासाची जबाबदारी अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्याकडे होती.

तपासातून उघडकीस आले की, ६ जून २०२४ रोजी राकेश जंगम याचा खून करून मृतदेह आंबाघाट येथे टाकण्यात आला होता. या प्रकरणात मुख्य आरोपी दुर्वास पाटील याने चौकशीत कबुली दिली असून त्याच्यासोबत विश्वास पवार व नीलेश भिंगार्डे यांचीही नावे समोर आली. राकेश जंगम हा दुर्वास पाटीलच्या खंडाळा येथील बारमध्ये वेटर म्हणून काम करत होता. २१ जून २०२४ रोजी राकेशच्या आईने जयगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती.

संपूर्ण वर्षभर शोधमोहीम राबवूनही जयगड पोलिसांना राकेशचा माग सापडला नव्हता.