गुरुसेवा सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात शिक्षक व विद्यार्थ्यांचा सन्मान
सावंतवाडी । प्रतिनिधी : गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनामुळेच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण क्षेत्रात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. या यशाचे खरे श्रेय येथील शिक्षकांनाच आहे, असे गौरवोद्गार माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे आयोजित गुरुसेवा सन्मान व विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात काढले. दरम्यान, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या कार्याची दखल घेण्यासाठीच हा उपक्रम दरवर्षी आयोजित केला जातो, असेही ते म्हणाले.
माजी मंत्री आ. दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात आदर्श शिक्षक ‘गुरुसेवा सन्मान’ पुरस्कार प्रदान करण्यात आले तसेच दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवही करण्यात आला. श्री. केसरकर यांच्या हस्ते जिल्ह्यातील अनेक शिक्षकांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
यामध्ये दीपक राऊळ (जि. प. शाळा, तिरोडे नं. १), अभिजीत जाधव (कलंबिस्त हायस्कूल), बाबाजी भोई (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जि. प. शाळा, माणगाव), राजेंद्र राठोड (भगवती देवी माध्यमिक विद्यालय, आंब्रड), रामजी पोळजी (जि. प. शाळा, मठ), शीला सामंत (एस. आर. पाटील हायस्कूल, पाट), देवीदास प्रभूगावकर (जि. प. शाळा, रेवतळे), राजू देसाई (भंडारी हायस्कूल, मालवण), स्वाती हिंदळेकर (जि. प. शाळा, दाभोळे नं. २), आफ्रीन बागी (देवगड हायस्कूल, देवगड), वंदना राणे (जि. प. शाळा, कणकवली नं. १), स्मिता गरगटे (एस. एस. हायस्कूल, कणकवली), प्रवीण देसाई (जि. प. शाळा, झोळंबे), समीर परब (झोळंबे हायस्कूल, झोळंबे), शोभा केळकर (जि. प. विद्यामंदिर, खांबाळे), आणि संदेश तुळसलकर (अर्जुन रावराणे हायस्कूल, वैभववाडी) यांचा समावेश होता.
यासोबतच बाबली चिले, शंकर पावसकर, संगीता सावंत, घनदा शिंदे, उन्नती कराळे, अनुराधा गावडे, सुनिता दळवी, आणि कल्पना बोडके यांचाही विशेष सन्मान करण्यात आला. सार्जंट अनंत चिंचकर व प्रशिक्षक गोपाळ गवस यांनाही विशेष गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी, महिला आघाडी प्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, बबन राणे, गटशिक्षणाधिकारी संविता परब, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधान सभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, शहर प्रमुख बाबु कुडतरकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, वासुदेव होडावडेकर, अर्चित पोकळे, भरत गावडे, विकास गोवेकर, म. ल. देसाई, निखिल सावंत, विठ्ठल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
*पालकांनी मुलांच्या आवडीचा आदर करावा – संजू परब*
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब म्हणाले की, आ. दीपकभाई केसरकर यांच्या हस्ते मिळालेला सन्मान शिक्षकांना एका नव्या उंचीवर घेऊन जाईल. राजकारणात आदराने वागणाऱ्या व्यक्ती फार कमी असून, त्यात दीपक केसरकर एक आहेत, असेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश मोठे असून, त्यांच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. पालकांनी मुलांच्या कलाने त्यांना भविष्य निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भरत गावडे यांनी केले, सूत्रसंचालन सौ. पालव यांनी केले तर आभार प्रदर्शन सीमा पंडीत यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











