डुमिंग आल्मेडा यांच्या पुढाकारानंतर उपनगराध्यक्षांकडून तात्काळ दखल
सावंतवाडी :सावंतवाडी शहरातील लता डिमेलो पाणंद परिसरातील चिवारटेकडी येथे गेल्या काही काळापासून स्ट्रीट लाईट नसल्याने स्थानिक नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. सध्या ख्रिस्ती बांधवांचा सायबिण उत्सव सुरू असून, दिवाळी हा दिव्यांचा सणही तोंडावर आला आहे. तसेच या भागात गवारेड्यांचा वाढता वावर असल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष झाले होते. या समस्येची गंभीर दखल घेत भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष डुमिंग आल्मेडा यांनी पुढाकार घेतला. त्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
परिसरातील नागरिक, भाविक आणि रात्रीच्या वेळी ये-जा करणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी विषयाचे गांभीर्य ओळखून तात्काळ पावले उचलली. त्यांच्या निर्देशानंतर नगरपालिका प्रशासनाने चिवारटेकडी परिसरात तातडीने नवीन स्ट्रीट लाईट बसवून संपूर्ण परिसर प्रकाशमय केला. सण-उत्सवाच्या काळात आणि जंगली प्राण्यांच्या दहशतीदरम्यान प्रशासनाकडून ही तात्काळ कारवाई झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
या तत्पर कारवाईबद्दल चिवारटेकडी परिसरातील रहिवाशांनी भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष डुमिंग आल्मेडा आणि उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.













