सिंधुदुर्ग: शिक्षक दिन आणि अभियंता दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या (SSPM) अभियांत्रिकी महाविद्यालयात इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) विद्यार्थी विभागा तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. १७ सप्टेंबर, २०२५ रोजी आयोजित या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. बाडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. बाडकर यांनी आपल्या भाषणात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनकार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांच्या प्रेरणेने विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्साहाने भाग घेतला.
या कार्यक्रमांतर्गत, ISTE विद्यार्थी विभागाचे पुन्हा उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर हॅकथॉन स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि ट्रेझर हंट अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे आयोजन संगणक अभियांत्रिकी, संगणक विज्ञान (AIML), संगणक विज्ञान, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स व संगणक विज्ञान या विभागांच्या सहकार्याने ISTE विद्यार्थी विभागाच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि एकोप्याची भावना निर्माण झाली. हा कार्यक्रम शिक्षक आणि अभियंते यांच्या योगदानाला आदरांजली वाहणारा ठरला.
सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक खासदार श्री. नारायणराव राणे, अध्यक्षा सौ.नीलम ताई राणे, उपाध्यक्ष आमदार डॉ. निलेश राणे तसेच सचिव मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नामदार श्री. नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम ISTE Student Chapter विभागतर्फे करण्यात आला होता.









