तारकर्ली पुला जवळ मध्यरात्री घटना : एक बोट फरार
परुळे l प्रतिनिधी :चीपी कालवडवाडी येथील जागरूक नागरिकांनी तारकर्ली पुला जवळ रात्री अवैध वाळू उपसा करीत असलेल्या तीन बोटी चा पाठलाग करून त्या बोटी पकडले. मात्र त्यापैकी एक बोट ग्रामस्थांच्या तावडीतून निसटली. या बोटीवर सात ते आठ परप्रांतीय कामगार होते मध्यरात्री साडेबारा च्या दरम्यान येथील जागरूक ग्रामस्थांनी रात्रीच्या अंधारात ही मोहीम राबविली.
तारकर्ली पुला जवळ गेले काही दिवसापासून अवैध वाळू उपसा सुरू होता. काल रात्री तीन बोटी तशाच पद्धतीने अवैध वाळू उपसा करीत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. ग्रामस्थानी एकत्र येत त्या तिन्ही बोटींचा पाठलाग केला आणि त्यांना पकडले. मात्र त्यातील एक बोट तेथून पळून गेली आहे. मात्र दोन बोटी पकडून त्या महसूल विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या.
चीपी पोलीस पाटिल संदेश दिनकर पवार यांनी याबाबत निवती पोलीस ठाणे येथे खबर दिली. यावेळी पोलीस अंमलदार महेश कदम, श्री. लोणे श्री .डिसोझा, ग्राम महसूल अधिकारी श्री आर एस नायकोडे, कोतवाल रुक्मानंद वरक यानी घटनास्थळी धाव घेतली व पुढील कारवाई करण्यात आली.
ग्रामस्थांनी सतर्क राहून ही गोष्ठ निदर्शनास आणून दिले. या बोटीवर मिळून सात आठ ब्रास वाळू होती. देवली येथील रॅम्प वर वाळू डंपर मध्ये भरली जात होती. या प्रकरणी पुढील तपास तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. रात्री साडे बारा ते पहाटे पाच वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.
सदरील कारवाईमध्ये दोन उत्खनन करणाऱ्या बोटी जप्त करण्यात आलेले असून सदरील बोटीमध्ये अंदाजे पाच ब्रास वाळू हस्तगत केली आहे. सदरील बोटीवरती काम करणारे पर राज्यातील ७ कामगार यांना पोलीस स्टेशन, निवती यांच्या ताब्यात देण्यात आलेले असून संबंधितांवरती गुन्हा नोंदवण्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई चालू आहे. या कामगारांमध्ये विर बहादूर संकर, विवेक बाबा, संतु बाबा, हिन्दू यादव, जितेंद्र सहा, ज्युव यादव, राजन बहर सर्व रा.तहसिल – बहरिया, जिल्हा – बलीया,राज्य – उत्तरप्रदेश यांचा समावेश आहे. सदरील कारवाई मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमसेन गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी रजनीकांत नायकोडे, गौतम सुतार, नामदेव मोरे, पोलीस हवालदार कदम, पोलीस ड्रायव्हर लोणे, पोलीस पाटील संदेश पवार चिपी आदी अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते.












