सामाईक विहिरीवरील पाणी काढण्याचा वाद तेरवण थोरलीवाडीतील चार जणांविरोधात गुन्हा

राजापूरः प्रतिनिधी तालुक्यातील तेरवण थोरलीवाडी येथे सामाईक विहिरीवरील पाणी काढण्याचे साहित्य न दिसल्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले. यामध्ये एक महिला जखमी झाली असून मारहाण करणाऱ्या चारजणांविरोधात राजापूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सहा मे २०२६ रोजी सकाळी साडेनऊ वाजता फिर्यादी सुवर्णा मोहन खानविलकर (वय ५४) या घरातील कामासाठी आणि गुरांना पाणी घालण्यासाठी सामाईक विहिरीवर गेल्या होत्या. तेथे पाणी काढण्याचे काढणे, रहाटाची कपी, रश्शी व दांडा दिसला नाही. याबाबत त्यांनी सत्यवान खानविलकर यांच्याकडे विचारणा केली असता चंद्रकांत खानविलकर याने मला माहित नाही मी काढून टाकले नाही असे उत्तर दिले. यावर सुवर्णा यांनी ही तिसरी वेळ आहे असे सांगितले. त्यावरून वाद वाढला. वादावेळी रवींद्र खानविलकर, चंद्रकांत खानविलकर व सत्यवान खानविलकर यांनी सुवर्णा यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दरम्यान रूपाली रविंद्र खानविलकर (वय ३०) तेथे आली आणि तिने हातातील लाकडी दांडक्याने सुवर्णा खानविलकर यांच्या डाव्या हाताच्या दंडावर मारून त्यांना जखमी केले.

याप्रकरणी सुवर्णा खानविलकर यांच्या फिर्यादीवरून राजापूर पोलिसांनी रुपाली खानविलकर, रविंद्र खानविलकर, चंद्रकांत खानविलकर, सत्यवान खानविलकर (सर्व रा.तेरवण, थोरलीवाडी) यांच्याविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८ (१), ३५२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास राजापूर पोलीस करत आहेत.