कोकण संस्थेतर्फे नऊवारी साडी शिवण प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन

महिलांना रोजगाराच्या संधी

बांदा l प्रतिनिधी : कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने चंदगड येथे नऊवारी साडी शिवण प्रशिक्षण वर्गाची सुरुवात करण्यात आली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना स्वतःचा उद्योग सुरू करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या प्रशिक्षणातून स्थानिक महिलांना घरबसल्या उत्पन्नाचे साधन मिळणार असून त्यांना व्यावसायिक आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होणार आहे.

 

उद्घाटनप्रसंगी समाजसेविका भरती जाधव, सहाय्यक कृषी अधिकारी रत्नमाला वाडेकर, प्राथमिक शिक्षिका स्नेहल कुरणे, डॉक्टर सौ. देसाई, सौंदर्य व्यवसायिक साळुंखे मॅडम आणि कोकण संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मनस्विनी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

यावेळी भरती जाधव म्हणाल्या, उद्योगधंद्यातून महिलांना केवळ आर्थिक स्वातंत्र्यच नव्हे तर सामाजिक आत्मभानही मिळते. महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी अशा प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

 

रत्नमाला वाडेकर यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि महिलांनी कृषीपूरक व्यवसायातही पुढाकार घ्यावा, असे सांगितले. साळुंखे मॅडम यांनी स्वतःचा व्यवसाय कसा उभा करावा यावर सखोल मार्गदर्शन केले. संस्थेच्या कार्यकर्त्या सौ. मनस्विनी कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. त्यांनी संस्थेच्या इतर उपक्रमांची माहितीही दिली.

 

या प्रशिक्षणातून चंदगडमधील महिलांना पारंपरिक कौशल्याचा आधुनिक बाजारपेठेत उपयोग करून रोजगार निर्माण करता येणार आहे. स्थानिक बाजारात तसेच ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरही साड्या विकण्याची संधी तयार होईल. भविष्यात महिलांनी स्वतःचे बुटीक किंवा घरगुती उद्योग सुरू करून इतर महिलांनाही रोजगार देण्याचा मार्ग या प्रशिक्षणामुळे खुला होणार आहे.