सावंतवाडी: माजगाव गरड येथे गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टोळीला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे. एका मारुती सुझुकी एर्टिगा गाडीच्या सीट कव्हरखाली विशेष कप्पे तयार करून ५७,६०० रुपये किमतीच्या १४४ दारूच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती. पोलिसांनी ही दारू आणि ९ लाख रुपयांचे एर्टिगा वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, अनिल धुरी आणि महेश जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली. माजगाव गरड येथे नाकाबंदी दरम्यान, MH09/FV/8406 क्रमांकाची मारुती सुझुकी एर्टिगा गाडी थांबवण्यात आली. गाडीची तपासणी केली असता, सीट कव्हरखाली लपवून ठेवलेल्या १४४ बाटल्या आढळून आल्या.
ही दारू गोवा ते कोल्हापूर अशी वाहतूक केली जात होती. पोलिसांनी चालक महेश आप्पा पाटील (वय ३५) आणि त्याचा साथीदार रोहन मानसिंग केंगारे (वय ३१), दोन्ही रा. हुपरी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेतले आहे. जप्त करण्यात आलेल्या दारूची किंमत ५७,६०० रुपये असून, एर्टिगा वाहनासह एकूण ९,५७,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सावंतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू आहे.













