ऐतिहासिक परंपरेची आजही जपवणूक
शिरगाव (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील साळशी हे गाव नवरात्रोत्सवाच्या ऐतिहासिक परंपरेसाठी विशेष ख्यातनाम आहे. चौ-याऐंशी खेड्यांचा अधिपती म्हणून मान मिळालेल्या साळशीतील इनामदार श्री देवी पावणाई देवालयात आश्विन शुद्ध प्रतिपदा, सोमवार २२ सप्टेंबर रोजी घटस्थापनेने शाही थाटात नवरात्रोत्सवाची सुरुवात होणार आहे. दसऱ्यापर्यंत हा उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी दुमदुमणार आहे.
उत्सव काळात दररोज सकाळी ८ वाजता सप्तशती पठण, त्यानंतर सकाळी ९ वाजता देवीचे दर्शन व ओटी भरणे, दुपारी १२ वाजता देवीची आरती व नैवेद्य,दुपारी १ वाजता देवीचे दर्शन व ओटी भरणे, दुपारी ४.३० पासून घडशी व गोंधळी यांचे सुरेल गायन-वादन, संध्याकाळी ७ वाजता नौबत, रात्री ९ वाजता प्रवचन (पुराण), तर रात्री १० वाजता देवीची आरती,रात्री १0.३0 वाजता देवीची पालखी प्रदक्षिणा कार्यक्रम, पालखी परत आल्यानंतर पुन्हा गायन-वादन होते. आणि रात्री १२ वाजता कीर्तनाचा कार्यक्रम होतो. किर्तन झाल्यानंतर आरती होऊन एक दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता होते.
आठ दिवस असेच धार्मिक सोहळे सुरू राहतात. नवव्या दिवशी नेहमीच्या कार्यक्रमाबरोबरच नवचंडी होम व सामुदायिक प्रार्थना होते. रात्री देवीची पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर देवालयाच्या सभामंडपात नाट्यप्रयोग सादर केला जातो. पहाटे लळीत व काकड आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता होते.
दुसऱ्या दिवशी विजयादशमी (दसरा) ऐतिहासिक शाही थाटात दसरा साजरा केला जातो.
या उत्सवानिमित्त इनामदार श्री देवी पावणाई व श्री देव सिद्धेश्वर देवालयांना विद्युत रोषणाईने सजवली जातात. देवी तसेच इतर देवदेवतांना नवे वस्त्रालंकार परिधान करून अलंकृत केले जाते. देवतरंगांना ही सजविले जाते.
इनामदार पावणाई देवीचा नवरात्रोत्सव व दसरोत्सव हा शतकानुशतकं चालत आलेली ही परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धा-उत्साहाने जतन केली जाते, हीच या उत्सवाची खरी ओळख आहे.












