स्मार्ट मीटरची सक्ती सहन करणार नाही

गुरुदास गवंडे यांचा महावितरणला इशारा

बांदा l प्रतिनिधी :बांदा परिसरातील गावांमध्ये स्मार्ट मीटर बसविणे विरोधात ग्रामसभेचा ठराव झालेला असतानाही सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर हे ग्राहकांनी सक्ती करीत आहेत. जीर्ण वीज वाहिन्या व पोल, निकृष्ट व बेभरवशाची सेवा अशा विविध तक्रारी असतानाही स्मार्ट मीटरची सक्ती सहन करणार नाही. आधी कारभार सुधारा अन्यथा ग्रामस्थासमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा सावंतवाडी सरपंच सेवा संघटना माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी महावितरण कार्यकारी अभियंता अरविंद वनमोरे यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

 

निवेदनात गुरुदास गवंडे यांनी महावितरणच्या कारभारावर टीका केली आहे. ते म्हणतात, बांदा परिसरातील निगुडे, कास ग्रामपंचायतीने गावात स्मार्ट मीटर बसवणे विरोधात ग्रामसभेत ठराव संमत केला आहे. असे असतानाही सहाय्यक अभियंता रघुनाथ ठाकूर हे गावात स्मार्ट मीटर बसवणे बाबत सक्ती करत आहेत. मडुरे येथे ११ केव्ही लाईन टाकण्याचे काम अत्यंत निकृष्टपणे करण्यात आले आहे. रस्त्याच्या एका दिशेने लाईन नेणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. मात्र, ठिकठिकाणी रस्त्यावरून क्रॉसिंग लाईन नेल्यामुळे भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. सदर कामावर महावितरणच्या अधिकाऱ्यांची पाहणी नसल्यामुळे ठेकेदार मनमानीपणे काम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सदर कामाची पाहणी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

 

तालुक्यात ठिकठिकाणी वीज वाहिन्या व वीजेचे खांब जीर्ण झालेले आहे. ते बदलण्याची यापूर्वीच वारंवार मागणी केली गेली आहे. मात्र महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. आधी आपला कारभार सुधारा, अन्यथा वीज ग्राहकांसमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. लवकरच मडुरे येथील कामाची पाहणी करणार असे आश्वासन अभियंता वनमोरे यांनी दिले.

———–