अधिकारी, कारखानदार, ग्रामस्थांसमवेत पाहणी
चिपळूण (प्रतिनिधी) : पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर गाणे-खडपोली एमआयडीसीतील अवजड वाहतूक पूर्णतः बंद पडल्यानंतर पर्यायी शिरगांव-पेढांबे, खडपोली मार्गावर २० टनापर्यंतची वाहने सोडण्यात येत होती. मात्र शुक्रवारी सर्व विभागाचे अधिकारी, खडपोली सरपंच, ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी संयुक्तपणे रस्त्यातील अडथळ्यांची पाहणी केल्यानंतर या मार्गावर ३० टनापर्यंतच्या वाहतुकीस प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी परवानगी दिली आहे.
सध्या या मार्गावर रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत २० टनी वाहने शिरगांव-पेढांबेमार्गे गाणे-खडपोली औद्योगिक वसाहतीत येत असून जाताना ती वालोटीमार्गे सोडली जात आहेत. अवजड वाहतूक सुरू करतानाही काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र आमदार शेखर निकम तसेच प्रांताधिकारी लिगाडे यांनी या सर्वांची समजूत करतानाच शेतीचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई देण्यात येईल, असे संगितले होते. दरम्यान, शुक्रवारी प्रांताधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शिवसेनेचे सचिन कदम, दशरथ दाभोळकर, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर, एमआयडीसी, महावितरण, बांधकाम, कारखानदार, पंतप्रधान ग्रामसडक योजना, सरपंच, ग्रामस्थ व शेतकरी यांच्यासमवेत खडपोलीतील रस्ता आणि त्यातील अडथळ्यांची पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना प्रांताधिकाऱ्यांनी दिल्या रस्त्यामध्ये असणारे काही अडथळे दूर केल्यानंतर या मार्गावर ३० टनापर्यंतची वाहने सोडण्याची परवानगी लिगाडे यांनी दिली.










