विनापरवाना अवैध गुरे वाहतुक प्रकरणी एका विरोधात राजापुर पोलीसांत गुन्हा दाखल

राजापूर (प्रतिनिधी): विनापवाना गुरांची वाहतुक केल्याप्रकरणी राजापूर पोलीसांनी वैभव वसंत साटेलकर रा. तेरसे बांबवडे ता. कुडाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तशी माहिती राजापूर पोलीसांनी दिली आहे. शनिवारी २० सप्टेंबर रोजी मुंबई गोवा महामार्गावर हातिवले येथे राजापूर पोलीसांनी ही कारवाई केली आहे.

राजापूर पोलीसांकडून मुंबई गोवा महामार्गावर पेट्रोलिंग सुरू असताना मुंबई गोवा महामार्गावर हातिवले येथे सायंकाळी ५ ते सहा वाजण्याच्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर हातिवले येथील पेट्रोलपंपाजवळ बोलोरो पिकअप गाडी क्रमांक एम. एच. ०७ ए. जे. ३१८३ या गाडीतुन वैभव वसंत साटेलकर हा गुरांची अवैध व विनापरवाना वाहतुक करताना आढळून आला.

या प्रकरणी पोलीस शिपाई अनिल केसकर यांनी तक्रार नोंदविली असून या प्रकरणी वैभव वसंत साटेलकर याच्या विरोधात प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करणे अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (जी), ११ (१) (डी), ११ (१) (सी) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.