साहित्य प्रेरणा कट्टा आजगाव यांचा मासिक कार्यक्रम शिरोडा येथे संपन्न..
वेंगुर्ले l दाजी नाईक :आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा सलग ५९ वा मासिक कार्यक्रम शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे यांच्या शिरोडा येथील निवासस्थानी संपन्न झाला. यावेळी साहित्यिकांच्या गाजलेल्या पुस्तकांवर सविस्तर विवेचन तसेच पुस्तकांचे कथानक सारांश रूपात सांगून पुस्तकांमधील काही महत्वाच्या भागांचे वाचन असे या कार्यक्रमाचे स्वरूप होते.
शिरोडा येथील या कार्यक्रमात डॉ. गणेश मर्ढेकर, प्रा.नीलम कांबळे व सचिन गावडे यांनी अनुक्रमे पहिले प्रेम (वि.स.खांडेकर), झपाटलेले सहजीवन-परंपरा मोडणारी परंपरा (भारत पाटणकर व प्राची पाटणकर) व लस्ट फॉर लालबाग (विश्वास पाटील) या पुस्तकांवर सविस्तर विवेचन केले. तिघानीही या पुस्तकांचे कथानक सारांश रूपात सांगून पुस्तकांमधील काही महत्वाच्या भागांचे वाचन केले.
साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी वाचन करता करता सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अनुभवांवर आधारित लेखनही करावे,असे सांगून वानगीदाखल गोव्यातील साहित्यिक दत्ताराम प्रभू साळगावकर यांच्या ‘अनुभवाचे बोल’ या पुस्तकातील ‘प्राणाचं दान’ या ललित लेखाचे वाचन केले. म्हापसा (गोवा) येथील श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक तथा विद्यार्थ्यांसाठी चालवण्यात येणारी वाचन साधना व पुस्तक भिशी योजना साहित्य प्रेरणा कट्ट्यातर्फे सुरू करावी असा प्रस्ताव विनय सौदागर यांनी मांडला.वाचन साधना योजनेंतर्गत दर महिन्याला एक पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहिले जाते,तर पुस्तक भिशी योजनेत दर महिन्याला ठरावीक रक्कम काढून भाग्यवान ठरलेला वाचक त्या रकमेतून आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करतो अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.या दोन्ही योजनेंवर पुढील मासिक कार्यक्रमात अंतिम निर्णय घेण्याचे ठरले.
कट्ट्याच्या साठाव्या मासिक कार्यक्रमांतर्गत दि.५ ऑक्टोबर रोजी शिरोडा येथील खटखटे ग्रंथालयात कोजागिरी कविसंमेलन होणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विनय सौदागर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर शेवटी सचिन गावडे यांनी ऋणनिर्देश केला. कार्यक्रमास खटखटे ग्रंथालयाचे अध्यक्ष राजन शिरोडकर, सांस्कृतिक समितीचे अध्यक्ष डॉ.श्रीराम दीक्षित, ग्रंथपाल प्राची पालयेकर,माजी ग्रंथपाल अर्चना लोखंडे, मांद्रे (गोवा) येथील ‘साहित्य संगम’ चे अध्यक्ष सुभाष शेटगांवकर, कार्यवाह गजानन मांद्रेकर,ज्येष्ठ पत्रकार अनिल निखार्गे, आंबा व्यावसायिक जनार्दन पडवळ, साहित्यप्रेमी प्रकाश वराडकर, कविता गावडे तसेच साहित्य प्रेरणा कट्ट्याचे सदस्य सरोज रेडकर, स्नेहा नारिंगणेकर, जयदीप देशपांडे, एकनाथ शेटकर, दिलीप पांढरे, सोमा गावडे, अनिता सौदागर, अविनाश जोशी, वैभवी राय शिरोडकर, शरद परुळेकर,सुनंदा परुळेकर आदी उपस्थित होते.












