दूध आणायला गेलेल्या बहीण भावाचं अपहरण

अवघ्या ८ वर्षाच्या रणरागिणीने अपहरणकर्त्यांचा डाव उधळला

प्रतिनिधी /रोहन कांबळे

कोल्हापूर: नांदणी गावात आठ वर्षांच्या स्वराने धाडस दाखवत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून स्वतःची सुटका केली. तिने चावा घेऊन आणि आरडाओरड करून भावाचा जीव वाचवला. पोलिस तपास सुरू असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्वरा देसाई ही ८ वर्षीय चिमुकली
संध्याकाळच्या सुमारास आपल्या लहान भावासह दूध आणण्यासाठी बाहेर पडली होती. गावातील रस्त्याने जात असताना अचानक मागून पाच अनोळखी व्यक्ती आले. त्यांनी स्वराचे आणि तिच्या भावाचे तोंड दाबून उचलून नेण्याचा प्रयत्न सुरू केला. घाबरून जाण्याऐवजी स्वराने धाडस दाखवत अपहरणकर्त्याच्या हाताला जोरात चावा घेतला आणि मोठ्याने आरडाओरडा केला. या अनपेक्षित प्रतिकारामुळे घाबरलेल्या अपहरणकर्त्यांनी दोन्ही मुलांना सोडून अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

मुलांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी धावून आले. त्यांना घडलेली घटना कळताच गावकरी संतापले. त्यांनी त्या अनोळखी व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारात ते फरार झाले. या घटनेमुळे गावात मुलांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्वराने आपल्या धैर्याने भावाचे प्राण वाचवले, यामुळे तिचे कौतुक सर्वत्र होत आहे. एका आठ वर्षांच्या मुलीने दाखवलेले हे साहस खरोखरच प्रेरणादायी ठरले आहे.
स्वराने अपहरणकर्त्यांपासून सुटका करत स्वतःचा व आपल्या भावाचा जीव वाचवला आहे. तिने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद ठरत आहे. मात्र अपहरणाच्या घटनेने पालक वर्गात संतापाची लाट उसळली आहे.

संबंधित गुन्ह्याची नोंद शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पालकांनी आपल्या लहान मुलांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. समाजमाध्यमांवरही या प्रकरणाबाबत संताप व्यक्त होत आहे.