धम्म चळवळ मजबूत करण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे : आनंद कासार्डेकर

​भारतीय बौद्ध महासभेच्या महिला प्रशिक्षण शिबिर

​सावंतवाडी: भारतीय बौद्ध महासभेने कणकवली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिल्हा भवन येथे महिला कार्यकर्त्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण तथा चिंतन शिबिर आयोजित केले होते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आनंद कासार्डेकर यांनी धम्म चळवळ मजबूत करण्यासाठी महिलांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला चांगले जीवन मिळाले असून, त्यांनी दिलेल्या धम्म आणि संघटनेला उर्जितावस्थेत आणण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.

​या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुषमाताई हरकुलकर होत्या. व्यासपीठावर जिल्हा पर्यटन व प्रचार उपाध्यक्ष संचिता जाधव, जिल्हा महिला चिटणीस अपूर्वा पवार, संघटक ममता जाधव, आणि सचिव संजय पेंडूरकर उपस्थित होते.
​आनंद कासारडेकर यांनी महिलांचे धम्म चळवळीतील योगदान यावर मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्ध महासभेची उद्दिष्टे आणि कामकाजाची माहिती दिली. आज महिला सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याने त्यांनी धम्म चळवळीतही पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सरचिटणीस संजय पेंडुरकर यांनी महिला पदाधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये यावर सखोल मार्गदर्शन केले.

​अध्यक्षीय भाषणात प्रा. सुषमाताई हरकुलकर यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, त्यामुळे धम्म चळवळीतही त्या निश्चितच पुढे राहतील, अशी आशा व्यक्त केली. महिलांनी यासाठी आपला वेळ द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
​या कार्यक्रमादरम्यान बौद्ध महासभेच्या संघटक ममता जाधव (उच्च श्रेणी मुख्याध्यापिका) आणि रजनी आनंद कासारडेकर (माध्यमिक शाळेतून सेवानिवृत्त) यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन उपाध्यक्ष स्नेहा पेंडुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील प्रमुख महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.