भारतीय किसान संघातर्फे मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांच्या माध्यमातून निवेदन
सावंतवाडी : भारतीय किसान संघ सिंधुदुर्गने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावंतवाडीच्या तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केले आहे. यामध्ये पीएम आशा योजनेंतर्गत शेतमालाची सरकारी खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावीत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
निवेदनानुसार, यावर्षी एप्रिल-मे महिन्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती खालावली आहे. अशा परिस्थितीत, व्यापारी कमी दरात शेतमाल खरेदी करण्याची शक्यता असून, यावर उपाय म्हणून सरकारने एमएसपी (MSP) दराने भात, सोयाबीन, मका, कापूस आणि कडधान्ये खरेदी करावीत. केंद्रांवर आलेला सर्व दर्जाचा माल कोणत्याही कारणामुळे परत पाठवू नये, अशीही मागणी करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून, त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसांत मदतनिधी मिळावा. तसेच, ‘ई-पीक पाहणी’ ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना नोंदणी करण्यात येत असलेल्या अडचणी लक्षात घेता, नोंदणीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्याची मागणीही करण्यात आली आहे.
पिक विम्याबाबत काही बदल केले असून, ते शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत. त्यामुळे गतवर्षीचेच नियम पुन्हा लागू करावेत, अशी विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास टप्प्याटप्प्याने उग्र आंदोलन करण्याचा इशारा भारतीय किसान संघाने दिला आहे.
यावेळी रामकृष्ण पंतवालावलकर, मुकेश ठाकुर, बाळकृष्ण कोचरेकर यांच्यासह सावंतवाडी तालुक्यातील ११ गावांचे २१ शेतकरी उपस्थित होते.













