सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बौद्ध समाजाने एकत्र येत स्थापन केलेल्या तथागत नागरी सहकारी पतसंस्थेने अल्पावधीतच जिल्ह्यात आपले स्थान निर्माण केले आहे. संस्थेच्या पहिल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री अरविंद वळंजू यांनी, “बौद्ध बांधवांनी लावलेल्या या रोपट्याचे रूपांतर वटवृक्षात करण्याचा प्रयत्न करावा आणि आपला उत्कर्ष साधावा,” असे आवाहन केले.
शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी कणकवली येथील भगवती मंगल कार्यालयात ही सभा संस्थेचे अध्यक्ष श्री अरविंद वळंजू यांच्या अध्यक्षेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री सूर्यकांत कदम, सचिव सुनील कदम आणि इतर संचालक मंडळासह जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
सभेची सुरुवात संस्थेचे सचिव सुनील कदम यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी संस्थेसाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रमोद कासले, सुनील कदम, रोहन कदम आणि राजेंद्र कदम यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. डी.के. पडेलकर यांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करत अभिनंदनपर ठराव मांडला आणि काही उपयुक्त सूचनाही दिल्या.
अध्यक्षीय भाषणात श्री. वळंजू यांनी सभासदांना संस्थेत जास्तीत जास्त ठेवी ठेवण्याचे आवाहन केले. भविष्यात संस्थेला संगणक प्रणालीशी जोडून अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष सूर्यकांत कदम आणि संचालक प्रमोद कासले यांनीही सभासदांना मार्गदर्शन केले.
मोहन जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर श्रद्धा कदम यांनी आभार मानले. मोठ्या संख्येने सभासद उपस्थित असलेल्या या सभेची सांगता राष्ट्रगीताने झाली.













