वेंगुर्ला पिराचा दर्गा येथील जावेद मकानदार याला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात
सायबर गुन्ह्यापासून सावध रहा : वेंगुर्ला पोलिसांचे आवाहन
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ला शहरात दिल्ली येथील अल्पवयीन मुलगी आपल्या घरात कोणासही न सांगता तिचा वेंगुर्ला येथील इंस्टाग्राम वरील मित्र जावेद मकानदार, रा. पिराचा दर्गा, ता. वेंगुर्ला याचेकडे आलेली होती. याप्रकरणी नॉर्थ वेस्ट दिल्ली जहांगीरपुरी पोलिसांकडे भा. द. वि. क. ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी वेंगुर्ले येथे येऊन त्या मुली बाबत वेंगुर्ले पोलिसांकडून माहिती घेऊन संशयित मकानदार याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
वेंगुर्ले पोलिसांना या प्रकाराबाबत माहिती मिळतच वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव यांनी त्या अल्पवयीन मुलगीची चौकशी केली. त्यावरून ती दिल्ली येथून घरातून निघून आल्याबाबत समजले.
त्यामुळे सदर अल्पवयीन मुलीची काल दिनांक ३० जून रोजी वैदयकिय तपासणी करुन तिला सुरक्षिततेच्या दृष्टीने अंकुर केंद्र सावंतवाडी येथे जमा केले. दरम्यान आज १ जुलै रोजी गुन्हयाच्या तपासाअनुषंगाने दिल्ली पोलीस वेंगुर्ला पोलीस ठाणे येथे आल्याने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्या मदतीने दिल्ली पोलिसानी सदर गुन्ह्यातील संशयित जावेद मकानदार याला ताब्यात घेतलेले आहे. तसेच अंकुर येथे जमा केलेल्या अल्पवयीन मुलीस वेंगुर्ला पोलिसानी दिल्ली पोलिसाना ताब्यात दिलेले आहे. दिल्ली पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याकामी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक श्री. अतुल जाधव , यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलि कुबल तसेच चौहान, भाटे, सुरेश पाटील यांनी काम पाहिले.











