मोर्ले-मिरवेल रस्त्याला वन विभागाची परवानगी: जनतेला मोठा दिलासा!

भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्या प्रयत्नांना यश!!

दोडामार्ग: सुहास देसाई

 

कोल्हापूर, बेळगाव आणि गोवा या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा आणि अनेक वर्षांपासून रखडलेला चंदगड तालुक्यातील मोर्ले-मिरवेल रस्ता अखेर मार्गी लागला आहे. वन विभागाने या रस्त्याच्या कामासाठी परवानगी दिल्याने स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या यशाचे श्रेय स्थानिक आमदार शिवाजी पाटील यांना दिले जात आहे, ज्यांनी या कामासाठी २०१९ पासून सातत्याने पाठपुरावा केला होता.

या रस्त्यासाठी भाजप आमदार शिवाजी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे सातत्याने प्रयत्न केले, ज्यामुळे २०२३ मध्ये ही परवानगी मिळाली.

वाहतुकीला मिळणार गती, अपघातांना बसेल आळा

हा रस्ता दोडामार्ग तालुक्यातील जनतेसाठी आणि गोवा राज्यासाठी एक जवळचा मार्ग ठरणार आहे. सध्या वापरला जाणारा तिलारी घाट हा अवजड आणि तीव्र वळणांमुळे धोकादायक बनला आहे. या घाटावर अनेक अपघात होत असल्यामुळे तो वाहनचालकांसाठी एकप्रकारे ‘मृत्यूचा सापळा’ ठरत आहे.

मोर्ले-मिरवेल रस्ता पूर्ण झाल्यानंतर, चंदगड तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्याशी थेट जोडला जाईल. याव्यतिरिक्त, गोव्याला जाण्यासाठी एक सोयीचा आणि सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. आमदार शिवाजी पाटील यांच्या मते, हा रस्ता वाहतुकीला गती देईल आणि परिसरातील व्यापार, उद्योग आणि पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळेल.

या रस्त्यामुळे दळणवळण अधिक सुरक्षित आणि जलद होईल, ज्यामुळे या भागाच्या आर्थिक विकासालाही मदत होईल.