ज्ञानदीप भडगावच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत उज्ज्वल यश

खेड (प्रतिनिधी) : खेड येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (उच्च माध्यमिक विभाग) तसेच कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव (माध्यमिक विभाग) येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत चमकदार कामगिरी करून खेड तालुक्याचा मान उंचावला आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी येथील क्रीडा संकुलावर नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय नेटबॉल स्पर्धेत ज्ञानदीप भडगावच्या 19 वर्ष, 17 वर्ष व 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या तसेच मुलींच्या संघांनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानंतर सर्व संघांची विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशात मार्गदर्शक शिक्षक संतोष भोसले यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विजेत्या खेळाडूंना त्यांच्या पालकांसह शाळा व संस्थेतर्फे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी संघांचे अभिनंदन करत पुढील विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.