खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील मुरडे ग्रामपंचायत हद्दीतील सावंत ब्रदर्स परमिट रूम व बिअर बार बंद करण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने निर्णय जाहीर केला आहे. महिला मतदारांच्या गुप्त मतदान प्रक्रियेनंतर आवश्यक ५० टक्के पाठिंबा न मिळाल्याने संबंधित मद्यविक्री परवाना बंद करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुरडे येथील ग्रामस्थांनी मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन दिले होते. त्यानुसार शासनाच्या नियमांनुसार महिला मतदारांचे गुप्त मतदान घेण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. २४ एप्रिल २०२६ रोजी मुरडे येथील मतदान केंद्रावर ही प्रक्रिया पार पडली.
राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादीप्रमाणे मुरडे ग्रामपंचायतीत एकूण १,५२३ मतदार असून त्यापैकी ७६० महिला मतदार आहेत. मतदानावेळी मद्यविक्री अनुज्ञप्ती सुरू ठेवावी यासाठी २२ मते पडली, तर अनुज्ञप्ती बंद करावी यासाठी २७१ महिला मतदारांनी मतदान केले. एकूण २९८ मते नोंदविण्यात आली.
शासन नियमानुसार मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद करण्यासाठी एकूण महिला मतदारांच्या किमान ५० टक्के मतदारांनी बंदीच्या बाजूने मतदान करणे आवश्यक असते. मुरडे येथे ही संख्या पूर्ण न झाल्याने सावंत ब्रदर्स हॉटेलची एफएल-३ प्रकारातील परमिट रूम व बिअर बारची अनुज्ञप्ती रद्द करता येणार नसल्याचा निष्कर्ष राज्य उत्पादन शुल्क विभागाने काढला आहे.
यासंदर्भातील आदेश राज्य उत्पादन शुल्क विभाग, रत्नागिरीचे अधीक्षक किर्ती रोंडे यांनी २९ मे २०२६ रोजी जारी केला असून मुरडे येथील सावंत ब्रदर्स परमिट रूम व बिअर बारची अनुज्ञप्ती पूर्ववत सुरू राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.











