मोटारचालक गंभीर जखमी
रत्नागिरी : प्रतिनिधी
निवळी-जयगड मार्गावरील करबुडे येथे मोटार आणि डंपर यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला. यामध्ये मोटारीचा पूर्ण चक्काचूर झाला असून चालक जखमी झाला. हा अपघात बुधवारी (ता. २४) दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला. अनिरुद्ध चव्हाण (रा. नाचणे) हे या अपघातात जखमी झाले. त्यांना तत्काळ उपचारसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. चव्हाण निवळीहून जयगडच्या दिशेने जात होते. तेव्हा जयगडहून निवळीच्या दिशेने जाणारा डंपर आणि मोटारीची धडक झाली. चव्हण यांची मोटार वहाळात पडली. अपघातात त्यांच्या गाडीचा चक्काचूर झाला. अपघातानंतर काही वेळात पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. चव्हाण यांना उपचारासाठी हलविण्यात आले. उशिरापर्यंत या अपघाताची नोंद पोलिस ठाण्यात झाली नव्हती.











