महावितरण आणि नगरपालिका अधिकारी कर्मचाऱ्यांचे यशस्वी प्रयत्न
चिपळूण | वार्ताहर : शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटी येथील इनलाईन डीटीसीवर शनिवारी रात्री झाड कोसळून सुमारे ६६० ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता. याबाबतची माहिती मिळताच चिपळूण महावितरण आणि नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन क्रेन आणि कटरच्या सहाय्याने ते झाड बाजूला केले. भर पावसात आणि काळोखात तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर रात्री १ वाजता बंद पडलेला वीज पुरवठा सुरळीत करत नैसर्गिक आपत्तीकाळात आम्ही कसे सतर्क आहोत याची चुणूक दाखवून दिली.
चिपळुणात गेले तीन चार दिवस पावसाचा जोर वाढला आहे. याच दरम्यान शनिवारी रात्री १०.१० वाजता शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटी येथील महावितरण कंपनीच्या इनलाईन डीटीसीवर झाड कोसळले. या झाडामुळे तेथील रोहित्र खाली पूर्णपणे झुकले होते. ११ के.व्ही. चिंचनाका वाहिनीवरील पुढील ७ रोहित्रे म्हणजे ६६० ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच महावितरणचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर व चिपळूण नगर पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. झाड मोठे असल्याने क्रेन मागविण्यात आले. त्यानंतर क्रेन व कटरच्या साहाय्याने ते झाड बाजूला करण्यात आले. त्यानंतर महाविरणच्या कर्मचाऱ्यांनी दुरूस्तीचे काम सुरू केले. पाऊस आणि त्यातच काळाकुट्ट अंधार पसरलेला असतानाच बॅटरीच्या उजेडात विद्युत खांबावर चढून कर्मचाऱ्यांनी युध्दपातळीवर कामाला सुरूवात केली.
नगर पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही या कार्यात विशेष सहयोग दिला. या सर्वाच्या अथक परिश्रमानंतर अखेर तीन तासांनी म्हणजेच रात्री १.१० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राजवळील चौपाटी येथील एक बंद ठेवून पूर्ण सप्लाय सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे सुट्टीच्या कालावधीत अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत आपली कार्यतत्परता दाखविल्याने शहरवासियांनी महावितरण व नगर पालिका प्रशासनाचे आभार मानले.












