सामाजिक समता प्रस्थापित करणारे छ. शाहू महाराज लोकराजे होते- प्रदीप मोहिते

चिपळूण | वार्ताहर : समाजातील सर्व जाती-धर्माच्या लोकांसाठी बोर्डिंग उभारून त्यांच्या शिक्षणासह सर्वांगीण उन्नतीसाठी प्रयत्न करणारे व दलितोद्धारासाठी विशेष प्रयत्न करून समाजातील तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे व जाती-जातीमधील भिंती दूर करून सामाजिक समतेच्या माध्यमातून माणसाला माणूसपण मिळवून देण्याचे महान कार्य राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकराजे होते, असे मत प्रा. प्रदीप मोहिते यांनी मांडले.
डी.बी.जे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रदीप मोहिते बोलत होते. घटनाकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी विशेष प्रयत्न केल्याचे व लोकमान्य टिळक यांनाही प्रसंगी मदत केल्याचे दाखले त्यांनी यावेळी दिले. आपल्या मनोगताच्या शेवटी प्रा. प्रदीप मोहिते यांनी शाहू महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित पोवाड्याचे सादरीकरण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. सौ. स्नेहल कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये थोर पुरुषांच्या चरित्रातून मिळणारे विचार अत्यंत प्रेरणादायी असतात व त्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधावा असे आवाहन केले.
यावेळी प्राचार्य डॉ. माधव बापट, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अनिल कलकुटकी, कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण जाधव, सहकार्यक्रमाधिकारी प्रा.विठ्ठल कोकणी, वरिष्ठ महाविद्यालयाचे एनएसएस विभाग प्रमुख प्रा. डॉ. उत्तमराव सूर्यवंशी, प्रा. विनायक बांद्रे, प्रा. प्रदीप वळवी, प्रा. सौ ऋतुजा लोंढे, प्रा. अनिल पुनवतकर, प्रा. कोंडीराम सावरे व कु. सुमित कदम, चैतन्य कुलकर्णी, रणजीत मोरे, निशांत जाधव, यश मते, सुरज सकपाळ, रवी राठोड, तृष्णा मोडक, अपूर्वा शिर्के, शर्वरी मोहिते, अंजली घाग यांच्यासह मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीराम देवळेकर यांनी, प्रमुख वक्त्यांचा परिचय आयुष आगवेकर यांनी तर आभार प्रदर्शन प्राची तांबे यांनी केले.