कोमसापतर्फे ११ रोजी सायंकाळी मोती तलावाकाठी आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
संस्थानकालीन सुंदरवाडी अर्थात सावंतवाडी शहराच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेच्यावतीने रविवार ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम वाचन मंदिर समोरील सेल्फी पाॅईट येथे ‘ व्यक्त व्हा आठवणी जागवा ‘ हा अनोखा कार्यक्रम आयोजित केला आहे.
संस्थानकालीन सावंतवाडी शहराचा इतिहास जगप्रसिद्ध आहे. या शहराला एक वेगळे ऐतिहासिक महत्त्व आहे. जगप्रसिद्ध लाकडी खेळणी, गंजिफा, संस्थानकालीन मोती तलाव, संस्थानकालीन राजवाडा, अध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक व साहित्यिक परंपरा अशा विविध अंगाने हे शहर संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगात आपली वेगळी ओळख निर्माण करून आहे. या सावंतवाडी अर्थात सुंदरवाडी शहराच्या जुन्या आठवणी जागवण्यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेने एक अनोखा असा उपक्रम सावंतवाडी शहरातील ‘जुन्या आठवणी जागवा आणि व्यक्त व्हा ‘ च्या माध्यमातून जुन्या जाणत्या सावंतवाडीकरांना व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
या उपक्रमात सावंतवाडी शहरातील जुन्या आठवणी शहराचा परिचय जुने व्यक्ती विशद करणार आहेत. त्यासाठी अनेकांनी नावे दिली आहेत. यात इतिहासावर प्रा. जी ए बुवा, सुधीर धुमे, रवींद्र ओगले, शंकर प्रभू ,अरुण वझे, अनिल परुळेकर, ॲड. अरुण पणदूरकर, श्री. घाटे, प्रकाश बांदेकर यांसह २५ हून अधिक जण ह्या कार्यक्रमात व्यक्त होणार आहेत. तसेच कार्यक्रमा वेळीही उपस्थित राहून काही जाणकार व्यक्तींनी आपणही व्यक्त होणार आहोत असे स्पष्ट केले आहे.
हा अनोखा व आगळावेगळा कार्यक्रम १० डिसेंबर रोजी होणार होता परंतु काही अपरिहार्य कारणामुळे तो ११ डिसेंबर सायंकाळी सहा वाजता मोती तलावाच्या काठी आयोजित करण्यात आला आहे. सदर जाणकार व्यक्ती सावंतवाडी शहराच्या आठवणी जागवणार आहेत त्या संकलित केल्या जाणार आहेत व त्यांचा सन्मानही केला जाणार आहे. त्यामुळे ज्या जाणकार व्यक्तींना अजूनही आपली नावे नोंदवायची असतील व ज्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी आपली नावे सहसचिव राजू तावडे ९४२२५८४४०७ व सचिव प्रतिभा चव्हाण यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच या कार्यक्रमाला सावंतवाडीकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. विशेषतः आजच्या तरुण पिढीने जुनी सावंतवाडी कशी होती हे शब्दांत ऐकण्यासाठी आणि ती जागवण्यासाठी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवावी, असे आवाहन कोमसाप तालुका अध्यक्ष ॲड. संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे यांनी केले आहे.
Sindhudurg