कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करणे हीच बॅ. नाथ पै यांना खरी आदरांजली : ना. नितेश राणे

पुढील जयंतीपूर्वी चीपी विमानतळाचे
बॅ. नाथ पै नामकरण होणार

बॅ. नाथ पै फाउंडेशनच्या माध्यमातून आदिती पै करीत असलेले कार्य गौरवास्पद

वेंगुर्ले । प्रतिनिधी :
कोकण विकासाच्या दृष्टीनं पहिलं पाऊल बॅ. नाथ पै यांनी उचललं ते कोकण विकास परिषदेचे अधिवेशन बोलवून. त्या परिषदेचे अध्यक्ष या नात्यानं त्यांनी कोकण विकासाचा सूत्रबद्ध आराखडाच सादर केला. कोकण रेल्वे हेही नाथ पै यांचं स्वप्न होतं. त्यांनी ही मागणी आग्रहानं अधिवेशनात लावून धरली. कोकण विकास परिषदेच्या रुपाने एक सर्वपक्षीय व्यासपीठ निर्माण करून त्यांनी कोकणच्या विकासासाठी कोकणी माणसाला एकत्र आणण्याचं काम केलं. त्यामुळे आज कोकणच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास तीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
वेंगुर्ले येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्र येथे उत्कृष्ट स्वातंत्र्यसैनिक उत्कृष्ट संसदपटू बॅ. नाथ पै यांची १०३ वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, बॅ. नाथ पै यांच्या नात तथा बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटचे अध्यक्षा आदिती पै, बॅ. नाथ पै संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, सौ. गाळवणकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, बाळू देसाई, सचिन वालावलकर, पप्पू परब, तहसीलदार श्री. ओतारी, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी बॅ. नाथ पै यांच्या कार्याचा गौरव केला. ज्यांचे भाषण ऐकण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु हे संसदेत आवर्जून उपस्थित राहत असत ते कोकणरत्न उत्कृष्ट संसदपटू म्हणून ओळख असलेल्या बॅ. नाथ पै यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच आमच्यासारखे तरुण आज काम करीत आहेत. कारण कोकणच्या विकासाबाबत तडजोड नाही. जेव्हा कधी कोकणचा विकासाविषयी येईल त्या त्यावेळी सर्वांनी एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून काम करायला हवे ही संकल्पना त्यावेळी नाथ पै यांनी मांडली. आज खासदार नारायण राणे, पालकमंत्री म्हणून मी तसेच आ. दीपक केसरकर, आ. निलेश राणे हे आम्ही सर्वजण आपापल्या परीने जिल्ह्याच्या विकासासाठी काम करीत आहोत.
त्यामुळे कोकणच्या विकासासाठी जर कोणी काम करीत असेल तर त्याला साथ देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे आज फार दुर्मिळ झालं आहे. मात्र, बॅ. नाथ पै यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार केवळ शब्दांमधून नव्हे तर कृतीतून दाखविण्याची आज गरज आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

बॅ. नाथ पै यांचे अपुरा कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमच्या खांद्यावर आहे. ते जेवढे उत्कृष्ट संसद पटू होते तेवढेच ते उत्कृष्ट असे लोकप्रतिनिधी देखील होते. त्यांचा प्रचंड असा दांडगा जनसंपर्क होता. घराघरात जाऊन ते प्रत्यक्ष जनतेला भेटून काम करीत असत. ‘नाथा ‘ म्हणून त्यांना आपुलकीने सर्वजण हाक मारीत असत. आम्ही देखील आज तीच प्रेरणा घेऊन जनतेत जाऊन काम करीत आहोत त्यामुळेच तीन-तीन वेळा जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. केवळ नेत्यांच्या गाडीत बसून तसेच बॅनर बाजी करून नेता बनता येत नाही त्यासाठी जनतेत जाऊनच काम करावे लागते ही शिकवण नाथ पै यांनी आम्हाला दिली. त्यांची हीच शिकवण उराशी बाळगून आम्ही काम करीत असून त्यांची कोकण विकासाची सर्वस्वपणे आम्ही साकार करू असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
पालकमंत्री म्हणून काम करत असताना आमदार दीपक केसरकर यांनी मला नेहमीच सहकार्य व मार्गदर्शन केले आहे. सिंधुदुर्ग चीपी विमानतळाचे
बॅ. नाथ पै नामकरण करावे यासाठी आ. दीपक केसरकर यांनी पुढाकार घेतला. आज आम्ही देखील त्याचा सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर देखील पाठपुरावा सुरू असून बॅ. नाथ पै यांच्या पुढील जयंतीच्या आधी किती विमानतळाचे बॅ. नाथ पै असे नामकरण केले जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिली.

आदिती पै व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून बॅ. नाथ पै यांचे कार्य पुढे नेण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. हे सर्व प्रकल्प तसेच त्यांचे पुस्तक यांच्या माध्यमातून त्या करीत असलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत. बॅ. नाथ पै समुदाय केंद्र ही वास्तू देखील त्यांच्या कार्याला साजेशी अशीच आहे. त्यामुळे यापुढे त्यांच्या या स्मृति मंदिरात ओरोस मुख्यालयात होणारे विविध शासकीय कार्यक्रम आयोजित केले जातील तसेच जनता दरबारांचे देखील आयोजन केले जाईल असा विश्वास व्यक्त करत असतानाच कोकणच्या विकासासाठी आम्हा सर्व लोकप्रतिनिधींना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी आदिती पै यांनी प्रयत्न करावा असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

चिपी विमानतळाचे बॅ. नाथ पै नामकरण होईल तो सुवर्णक्षण : आ. दीपक केसरकर

यावेळी आमदार दीपक केसरकर म्हणाले, बॅ. नातपय यांची आठवण आमच्या प्रत्येकाच्या हृदयात खोलवर जपली गेली आहे. एक उत्कृष्ट संसद पटू म्हणून त्यांची ओळख होती. कोकणात समाजवादी विचारसरणीचे विचार त्यांनी रुजवले. त्यामुळे त्यांच्या या कार्याची कायमस्वरूपी आठवण टिकविण्यासाठी ज्या दिवशी सिंधुदुर्गची पी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात येईल तो कोकणासाठी सुवर्णक्षण ठरेल व त्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.

ना. नितेश राणे बॅ. नाथ पै यांचे विचारच पुढे नेत आहेत : आदिती पै

बॅ. नाथ पै यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शवलेली उपस्थिती ही गौरवास्पद आहे. जिल्हा नियोजनचे सदस्य असताना या बॅ. नाथ पै यांच्या नावाने कार्यरत असलेल्या समुदाय केंद्रासाठी त्यांनी नेहमीच सहकार्य व पाठिंबा दिला होता. खा. नारायण राणे यांच्या हस्तेच या केंद्राचे उद्घाटन झाले होते. आज नितेश राणे यांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रेमाचा व आदराचं एक प्रतीक जपल आहे. एक तरुण नेते म्हणून बॅ. नातपई यांचे कार्यच ते पुढे नेत असल्याचे हे द्योतक आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री या नात्याने नाथ पै यांच्या मनातील अनेक विषय ते पुढे नेत आहेत. शासकीय कामकाजात Al चा वापर करून नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आमच्यासारख्या तरुणांना स्फूर्ती मिळेल असे कार्य देखील त्यांच्या हातून घडत आहे. या सर्व गोष्टींच्या माध्यमातून बॅ. नाथ पै यांचे कोकणच्या सर्वांगीण विकासाचे विचारच ना. नितेश राणे पुढे घेऊन जात आहेत, असे गौरवोद्गार बॅ. नाथ पै यांच्या नात तथा बॅ. नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटचे अध्यक्षा आदिती पै यांनी काढले.
कार्यक्रमाचे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते झाले. प्रस्ताविक आदिती पै यांनी केले. यावेळी वेंगुर्लेचे माजी सभापती जयप्रकाश चमणकर यांनी देखील आपले विचार मांडले.कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या ना. नितेश राणे, आ. दीपक केसरकर व अन्य मान्यवरांना बॅ. नाथ पै संस्था तसेच फाउंडेशनच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले. यावेळी बॅ. नाथ पै प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.