बागेत काम करणारा मजूर सापडला मृतावस्थेत

देवगड / प्रतिनिधी

 

देवगड तालुक्यातील नाद ‘बेब्याचा सडा’ येथे यशवंत रमेश सावंत यांच्या कलम बागेत काम करणारे तिमन्ना तिपन्ना निलगुंड (५९, मूळ रा. हलकुरकी, बदामी बागलकोट, जि. कर्नाटक) हे २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास बागेतीलच घरात मृतावस्थेत आढळून आले. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू अशी करण्यात आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाद येथील यशवंत सावंत यांच्या तेथील ‘बेब्याचा सडा’ या भागातील कलम बागेत संतोष शिवराम देवळेकर (४५, मूळ रा. गढीताम्हाणे, ता. देवगड) व तिमन्ना निलगुंड हे मोलमजुरीच्या कामास होते. हे दोघेही सावंत यांच्या कलम बागेतील एका घरात वास्तव्य करीत होते. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९.३० वा. च्या सुमारास देवळेकर हे बागेत कामास गेले असता त्यांना तिमन्ना निलगुंड हे तेथे दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांनी बागेतील घरानजीक जाऊन निलगुंड यांना हाक मारली असता त्यांचा कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे देवळेकर यांनी खिडकीतून घरात वाकून पाहिले असता निलगुंड हे कोणत्याही प्रकारची हालचाल करीत नसल्याचे दिसले. देवळेकर यांनी याची माहिती बागेचे मॅनेजर मोहन मोरे व पोलीस पाटील यांना दिली. पोलीस पाटीलांच्या समक्ष घराचा दरवाजा उघडला असता निलगुंड हे मृत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची फिर्याद संतोष देवळेकर यांनी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार आशिष कदम करीत आहेत.