पोलिसांवर चाकूने हल्ला

आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास

कणकवली :
वैभववाडी पोलिस ठाण्यात आलेल्या डायल ११२ कॉलला प्रतिसाद देण्यासाठी पोलिस कर्मचारी कोकिसरे – नारकरवाडी येथे गेले असता, आरोपी राजरत्न अंकुश देवकर (३२, रा. कोकिसरे – नारकरवाडी) यांनी पोलिसांना शिवीगाळ करत सरकारी कामकाजात अडथळा आणला. यावेळी त्याने पोलिस नाईक रमेश नारनवर यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला.

सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी शुक्रवारी आरोपीला भा.द.वि. ३०७, ३५३, ३३२ कलमांखाली दोषी ठरवून १० वर्षे सश्रम कारावास आणि वेगवेगळ्या कलमांन्वये १८ हजार रूपयांचा दंड ठोठावला. सरकारी पक्षाचे वतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकर यांनी काम पाहिले.

कोकिसरे – नारकरवाडी येथील कुमार स्वामी यांच्या घरी आरोपी आई-वडिलांसह भाड्याने राहत होता. मुलगा राजरत्न घरातील भांडणानंतर हिंसक झाला. ९ एप्रिल २०२२ रोजी त्याने आई-वडिलांवर मारहाण केली. दोन चाकू घेऊन तो बेभान झाला होता. घरमालकांनी वैभववाडी पोलिसांना ११२ कॉल करून मदत मागितली.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून राजरत्नला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. त्याने चाकू घेऊन पोलिसांवर हल्ला केला. या झटापटीत नारनवर यांना पाठीत गंभीर जखम झाली. इतर पोलिस व ग्रामस्थांनी हस्तक्षेप करून आरोपीच्या हातातील चाकू काढला.

राजरत्न देवकरला ताब्यात घेत वैभववाडी पोलिस ठाण्यात आणले गेले, तर जखमी नारनवर यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय वैभववाडी आणि नंतर एसएसपीएम रुग्णालयात दाखल केले. तपास उपनिरीक्षक प्रविण देसाई यांनी केला. सुनावणी दरम्यान आरोपीने वेडसर असल्याचा बचाव केला, मात्र सरकारी अभियोक्ता गजानन तोडकर यांनी त्याचा बचाव खोडून काढला. आरोपीची नंतर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली.