सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर रोलर स्केटिंगचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. नवनिर्वाचित अध्यक्ष विक्रांत सावंत यांना शुभेच्छा देण्यासाठी श्री. राणे संस्थेत आले असता, मैदानी खेळांचे धडे घेणाऱ्या या उत्साही विद्यार्थ्यांसोबत ते आनंदाने रमले.
विद्यार्थ्यांचा सराव पाहून पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांचे मनभरून कौतुक केले. मुलांच्या खेळाबद्दलचा उत्साह आणि मेहनत पाहून त्यांनी या खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी त्यांनी संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांना आश्वासन दिले की, विद्यार्थ्यांच्या क्रीडा सुविधा तसेच अन्य सर्व गरजांसाठी पालकमंत्री या नात्याने जी काही मदत करता येईल, ती सर्वस्वी मदत आपण निश्चितपणे करू.
राणी पार्वती देवी हायस्कूलच्या पटांगणावर हे विद्यार्थी रोलर स्केटिंग आणि रोल बॉल या क्रीडा प्रकारांचे प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांची कामगिरी उल्लेखनीय असून, त्यांचे चार संघ सध्या विभाग स्तरावर खेळण्यासाठी पात्र ठरले आहेत. यावेळी क्रीडा प्रशिक्षकांनी भविष्यात याच खेळाडूंमधून रोलर हॉकी संघ निर्माण करण्याचा मनोदय व्यक्त केला. पालकमंत्री राणे यांनी विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या खेळातील प्रगतीची चौकशी केली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रशिक्षकांसह सर्व शिक्षक आणि विद्यार्थांचे त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल कौतुक केले. क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे उपस्थित सर्व विद्यार्थी आणि संस्थाचालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.













