मुसळधार पावसात मालवणात पडझडीच्या घटना

 

दांडी मोरेश्वरवाडी स्मशानभूमीतील पत्राशेड कोसळली ; असगणी येथे सार्वजनिक विहीर कोसळली

मालवण | प्रतिनिधी : गेले चार दिवस मालवणात कोसळणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारी कायम होता. त्यासोबत वाऱ्यांचा जोरही वाढला. मुसळधार पावसामुळे शहरासह काही गावात पडझड तसेच वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.

शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यात दांडी किनारपट्टी मोरेश्वरवाडी येथील स्मशानभूमी वरील पत्र्याची शेड व काही बांधकाम उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. असगणी येथील ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर कोसळून ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. ओवळीये येथील अंकुश विष्णू गुळेकर यांच्या घरावर झाड पडून भिंत कोसळल्याने सुमारे ३३ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मालवण तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे.

 

फोटो : दांडी मोरेश्वर वाडी येथील स्मशान भूमीवरील पत्र्याची शेड उडून गेल्याने नुकसान झाले. (अमित खोत, मालवण)

फोटो : असगणी येथील ग्रामपंचायतीची सार्वजनिक विहीर कोसळून नुकसान झाले.