वाहत्या पाण्यासोबत येणारा कचरा ठरतोय शेतकऱ्यांना मारक

 

आचरा देवमळ्यातील स्थिती

आचरा–अर्जुन बापर्डेकर : आचरा तिठा येथील ओढ्यात फेकलेला कचरा ,दारूच्या बाटल्या पावसाच्या पाण्यासोबत देवूळवाडी येथील रामेश्वर मंदिर लगतच्या मळ्यात येवून विखरत असल्याने येथील शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.एकीकडे शेती करणे मोठ जिकीरीचे बनले असताना शेतीकरण्यासाठी आटापिटा करणारया शेतकऱ्यांना मात्र कचरा समस्येच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
आचरा रामेश्वर मंदिर नजिकच्या विस्तिर्ण पसरलेला सुपीक मळा आहे. देवूळवाडी डोंगरे वाडी,बौद्धवाडी,भंडारवाडी पर्यंत हा मळा विस्तारलेला आहे. पुर्वी या मळ्यात द्विपीक शेती केली जायची.येथे बासमती तांदळाचाही सुगंध दरवळायचा असे जुन्या जाणत्यांकडून सांगितले जायचे. मनुष्यबळाची कमतरता, भटक्या जनावरांपासून शेतीसंरक्षणासाठी आवश्यक कुंपण कोणी घालायचीआदीबाबींमुळे उन्हाळी भात शेती करणे बंद झाले. फक्त पावसाळीच शेती केली जावू लागली. पण याशेतीच्याही मुळावर वाहत्या पाण्यासोबत येणारया कचरयाची समस्या उभी राहत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. आचरा तिठा शासकीय विश्राम गृहाकडून वाहत येणारा ओढा या मळ्यात मोकळा होतो. उन्हाळ्यात कोरडा पडलेला हा ओहोळ पावसाळ्यात पावसाच्या पाण्याने वाहू लागतो. उन्हाळ्यात या कोरड्या ओहोळात अनेक जण कचरा टाकतात .यात जुने कपडे, प्लॅस्टीक, दारुच्या बाटल्या, इतरही कचरा आदी टाकत असतात. वाहून आलेली घाण शेतकऱ्यांच्या शेतात पसरत असल्याने. नांगरणी करताना अडचणी येतात.बाटल्या फुटून जनावर,शेतकरी जखमी होतात.यामुळे प्रशासनाने सदर कचरा टाकणारयांवल कडक कारवाई करण्याची मागणी देवूळवाडी येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.