शरद पवारांचा अनेकदा घुमजाव; छगन भुजबळांचा थेट आरोप
नाशिक : नाशिक (Nashik) येथे काल शरद पवार (Sharad Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) एकाच वेळी होते. शरद पवारांनी आपल्या महाराष्ट्र दौर्याची सुरुवात नाशिकमधील येवला या छगन भुजबळांच्या मतदारसंघातून केली. मात्र यावर ओबीसी नेत्याच्या मतदारसंघातच पहिली सभा का? तसेच राजीनामा दिला तर मागे घेतलाच कशाला? असा खोचक सवाल छगन भुजबळ यांनी विचारला आहे. शिवाय शरद पवारांनी अनेकदा घुमजाव केला आहे, भविष्यात मी अनेक गौप्यस्फोट करणार आहे, असे थेट आरोप छगन भुजबळ आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांवर केले.
छगन भुजबळ म्हणाले, मी येवल्यामध्ये काहीतरी विकास केला आहे म्हणून मी सतत निवडून येतो. शरद पवार म्हणायचे की येवल्यासारखा विकास कुठे झाला नाही, मात्र ते काल म्हणाले की माफ करा मी तुम्हाला चुकीचा उमेदवार निवडून दिला. मला कळत नाही ते येवल्यात आलेच का? ओबीसी नेत्याच्या मतदारसंघातच पहिली सभा का? असा तिखट सवाल भुजबळांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, त्यांनी सगळ्या सभा रद्द केल्या. पण येवल्यातील सभा रद्द केली नाही. ओबीसीचा नेता आहे, म्हणून ते इथे पहिल्यांदा आले. मला वाईट वाटलं की त्यांनी माफी मागितली. अशा किती ठिकाणी ते माफी मागणार? ५० ठिकाणी? गोंदियापासून कोल्हापूर, पुण्यापासून बीड, लातूरपर्यंत तुम्ही माफीच मागणार का? असा खोचक सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला.
मी येवल्याची निवड केली
२००४ मध्ये मला शरद पवारांनी निवडणुकीला उभं राहायला सांगितलं. त्याआधी मी मुंबईच्या एका मतदारसंघातून दोन वेळा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलो होतो. शरद पवारांनी मला येवल्याला पाठवलं नाही. येवल्याशी तसा माझा खास संबंध नव्हता. एकदा शिवसेनेच्या शाखेच्या उद्घाटनाला गेलो होतो. त्यानंतर राष्ट्रवादी उमेदवाराच्या प्रचाराला गेलो होतो. परंतु, येवलावासियांनी एक मुद्दा मांडला. आमच्या तालुक्यात दुष्काळ आहेच, पण विकासही झालेला नाही. आम्हाला विकासासाठी तुम्ही पाहिजे आहात. इथले लोक मला येण्याची विनंती करत होते, मला वाटलं मला इथे काम करण्याची संधी आहे म्हणून पवारांना तसं सांगून मी येवल्याची निवड केली.
राजीनामा दिला तर मागे घेतलाच कशाला?
शरद पवारांनी पुस्तक प्रकाशनाच्या वेळीच सांगितलं की मी आता थांबणार आणि संस्थेचं काम पाहणार आहे. तेव्हा पंधरा दिवसांपूर्वीच सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राष्ट्रीय पातळीवर तर अजित पवार यांनी महाराष्ट्रात पक्षाची जबाबदारी घ्यावी, असं ठरलं होतं. मात्र ३ दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. परत त्यांचा निरोप आला की दिल्लीच्या सभेत सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करायचं आहे. प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) हे उपाध्यक्ष होते त्यामुळे दुस-या क्रमांकावरुन तिस-यावर जाण्यापेक्षा राजीनामा देण्याची भूमिका त्यांनी घेतली. म्हणून आमच्या सांगण्यावरुन दोघांनाही कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं. शरद पवारांनी असा अनेकदा घुमजाव केला आहे.
शरद पवारांनी विचार करावा
हे झालं कुठून? साहेब तुमच्या घरातून झालं ना? आता ६१-६२ वर्ष ज्यांना तुम्ही सांभाळलं ते अजित पवार तर मुख्य आहेत. ते तर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत, ते बघा ना का आहेत ते. ही इतकी मंडळी का गेली याचा विचार करा. दिलीप वळसे-पाटील (Dilip Valse Patil), अजित पवार (Ajit Pawar), प्रफुल्ल पटेल यांसारखी एवढी जवळची माणसे सोडून का गेली असावीत, याचा शरद पवारांनी विचार करावा. याआधी सोनिया गांधी, नरेंद्र मोदी यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी पवार साहेब प्रफुल्ल पटेलांनांच पाठवत होते. ते का सोडून गेले याचा विचार करायला पाहिजे. शरद पवारांना वाटतं की, छगन भुजबळांनी हे घडवून आणलं ही चुकीची कल्पना आहे, असेही भुजबळ म्हणाले. पक्षांच्या युतीबाबत ज्या काही बैठका व्हायच्या त्यांना मी कधीच नव्हतो. त्या सर्व चर्चा अजितदादा, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यातच व्हायच्या. म्हणजे त्यांनीच सगळं केलं मग मला दोष कशासाठी? असं छगन भुजबळ म्हणाले.
त्यामुळे पहाटेचा शपथविधी पार पडला
२०१९च्या निवडणुकीतदेखील भाजपसोबत युती करायचं ठरलं होतं. अजितदादांसमोरच हे ठरलं होतं. मात्र अचानक शरद पवारांनी घूमजाव केलं त्यामुळे पहाटेचा शपथविधी पार पडला. अशा अनेक गोष्टींमध्ये माझा सहभाग नव्हता मग येवल्यात येऊन माझ्यावर राग काढायचं काय कारण? असे सवाल उपस्थित करत छगन भुजबळ शरद पवारांवर थेट आरोप केले. त्यामुळे आता राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर आणखी काय काय गौप्यस्फोट होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.