दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला : उद्या फैसला!
सावंतवाडी । प्रतिनिधी :
राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात आला आहे. नगराध्यक्षपदाच्या ६ उमेदवारांसह एकूण ८६ उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी आपले नशीब आजमावले असून या हायव्होल्टेज निवडणुकीचा निकाल रविवारी जाहीर होणार आहे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत सावंतवाडीची ‘कारभारीण’ कोण होणार आणि विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ही निवडणूक केवळ स्थानिक उमेदवारांची नसून जिल्ह्यासह राज्यातील बड्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरली आहे. शिवसेनेचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर यांचे हे ‘होमपीच’ असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि पालकमंत्री नितेश राणे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी विशेष ताकद लावली आहे. उबाठा शिवसेनेच्यावतीने माजी खासदार विनायक राऊत व आमदार महेश सावंत यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष घातले होते. काँग्रेसने मात्र यावेळी स्वबळाचा नारा दिला असून त्यांच्या मदतीला एकही वरिष्ठ नेता मैदानात उतरला नव्हता, त्यामुळे काँग्रेसच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष आहे.
नगराध्यक्षपदासाठी भाजपच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, शिवसेनेच्या ॲड. नीता सावंत-कविटकर, उबाठा शिवसेनेच्या सीमा मठकर आणि काँग्रेसच्या साक्षी वंजारी यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र, अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांची बंडखोरी आणि निशाद बुराण यांनी घेतलेली झेप कोणाचे राजकीय गणित बिघडवणार, यावर निकालाचा फैसला अवलंबून असणार आहे.
प्रभागांमधील लढतींकडे नजर टाकल्यास प्रभाग २ ‘ब’ मध्ये माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आणि माजी नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्यात तगडी फाईट होत आहे. प्रभाग ७ ‘ब’ मध्ये माजी नगराध्यक्ष संजू परब आणि माजी नगरसेवक उदय नाईक यांच्यात थेट लढत होत असून प्रभाग ८ ‘ब’ मध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना रंगला आहे. येथे भाजपचे प्रतीक बांदेकर आणि शिवसेनेचे माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आमनेसामने आहेत. प्रभाग ५ ‘ब’ मध्ये सुधीर आडिवरेकर, उमेश कोरगावकर, बंड्या कोरगावकर आणि समीर वंजारी यांच्यात चौरंगी लढत होत असल्याने येथून कोण बाजी मारणार याची चर्चा रंगली आहे.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना आणि उबाठा शिवसेनेचे प्रत्येकी २० उमेदवार, काँग्रेसचे १७, राष्ट्रवादीचे ५ आणि ५ अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत. मनसे आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांनी उबाठा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवली आहे. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रयत्न केले असले तरी, अनेक ठिकाणी बंडखोरांनी दिलेले आव्हान नेत्यांची डोकेदुखी वाढवणारे ठरले आहे. रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात होईल आणि दुपारपर्यंत सावंतवाडीची नवी कारभारीण कोण याचे चित्र स्पष्ट होईल.













