पोईप येथे वहाळात पडून हॉटेल कामगाराचा मृत्यू

मालवण | प्रतिनिधी : पोईप बाजारपेठ येथील एका हॉटेलात आचारी म्हणून काम करणाऱ्या मनोज प्रल्हाद मोरे (वय ३६) या तरुणाचा मृतदेह विरण- पोईप सीमेवरील वहाळात शनिवारी दिसून आला. याबाबत पोलीस पाटील यांनी मसुरे पोलीस दूरक्षेत्राला खबर दिली. मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मनोज मोरे हा तरुण दीड महिन्यापूर्वी पोईप येथील एका हॉटेल मध्ये कामाला आला होता. शनिवारी परिसरातील दुकानातून काही खरेदी करून परत येत असता पोईप विरण सीमेवरील वहाळात तोल जाऊन पडल्याने त्याचा मृत्यू झाला. दारुच्या नशेत असल्याने त्याला पाणी कमी असूनही उठता आले नाही. परिणामी, पाण्यात गुदमरून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

त्याचे कोणीही नातेवाईक नाहीत. त्याच्याकडील आधारकार्डवरील पत्त्यामुळे त्याच्या मुंबई येथील नातेवाईकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना समजताच मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत, हेड कॉन्स्टेबल राजन पाटील, सुहास पांचाळ, प्रमोद नाईक, कॉन्स्टेबल सिद्धेश चिपकर यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.