रत्नागिरी प्रतिनिधी : रत्नागिरीतील सराईत गुन्हेगार अश्रफ उर्फ अडर्या महमूद शेखचा उपचारांदरम्यान रविवारी सकाळी 6.20 वा जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला.त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
अंमली पदार्थ विक्रिसाठी जवळ बाळगल्याप्रकरणी अडर्या न्यायालयीन कोठडीत असताना त्याला रविवारी सकाळी 6 वा. श्वसनाचा त्रास जाणवू लागला.त्यामुळे त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता उपचारांदरम्यान सकाळी 6.20 वा.वैद्यकिय अधिकार्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
काही दिवसांपूर्वीच शहरातील मच्छिमार्केट येथील खान कॉम्प्लेक्स येथे बेकायदेशिरपणे 16 हजार 800 रुपयांचा 1.73 ग्रॅम ब्राउन हेरॉईन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी आपल्या जवळ बाळगल्याप्रकरणी शहर पोलिसांनी त्याला अटक केली होती.त्याला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलिस कोठडीनंतर त्याची रवानगी न्यायालयनी कोठडीत करण्यात आली होती.या कालावधीत त्याला श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने पोलिसांनी त्याला उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते.परंतू उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.याबाबत शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.