कणकवलीत सापा विषयी जनजागृती व सुरक्षितता कार्यक्रम

‘ वाइल्डलाईफ सेव्हियर्स ‘ संस्थेच्या वतीने कणकवली जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथे मार्गदर्शन

कणकवली : कणकवली जिल्हा परिषद शाळा क्र. १ येथे साप जनजागृती व साप सुरक्षितता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सापांची ओळख, निसर्गातील त्यांचे महत्त्व तसेच साप चावल्यास करावयाचे योग्य प्रथमोपचार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान नाग सापाचे पिल्लू, तस्कर साप आणि डुरक्या घोणस साप प्रत्यक्ष दाखवण्यात आले. मुलांमधील सापांविषयीची भीती दूर करून त्यांना योग्य माहिती मिळावी व जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

‘वाइल्डलाईफ सेव्हियर्स’ या संस्थेमार्फत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी सर्पमित्र ओंकार सावंत, प्रतीक सावंत, आर्यन सावंत, ओम ढेकणे आणि यश बागवे यांनी विशेष सहभाग घेतला. शाळेच्या शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत कौतुक व्यक्त केले.