ओंकार हत्तीचा कास गावात प्रवेश

बांदा : प्रतिनिधी
तांबोसे (गोवा) येथून आलेला ओंकार हत्ती गेल्या दोन दिवसापासून मडूरा, सातोसे भागात स्थिरावला आहे. रविवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास त्याने कास देऊळवाडी परिसरात प्रवेश केला. त्यामुळे कास गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. हत्तीला हुसकावून लावण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ वनविभागाच्या मदतीने कसोशीने प्रयत्न करीत होते.

तांबोसे – उगवे परिसरातून ओंकार हत्तीने तेरेखोल नदीतून सातोसे रेखवाडी येथे शनिवारी दुपारी प्रवेश केला. रविवारी संध्याकाळपर्यंत त्याचा सातोसे लिंगेवाडी येथील जंगलात वावर होता. सायंकाळी ६ नंतर तो सातोसे रेखवाडी येथील शेती क्षेत्रात आला. काही वेळातच कास देऊळवाडी परिसरात त्याचे आगमन झाले.

कास माऊली मंदिर नजीक भरवस्तीत ओंकार हत्तीने प्रवेश केल्याने स्थानिकांची एकच धावपळ उडाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह जलद कृती दलाचे जवान हत्तीला जंगल परिसरात मिळण्यासाठी प्रयत्न करीत होते. रात्री उशिरापर्यंत तो देऊळवाडी भागातच होता, अशी माहिती कास सरपंच प्रवीण परब पंडित यांनी दिली.
——-