मूल्यवर्धन प्रशिक्षण महत्वाचे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता? पालकांतून सवाल
संतोष कोत्रे | लांजा -: जि. प.शाळांच्या सहामाई परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाच डाएट प्राचार्यांकडून या सर्व जि.प.शिक्षकांसाठी मूल्यवर्धन प्रशिक्षणाचा घाट घातला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे आणि कधी? असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला असून मूल्यवर्धन प्रशिक्षण महत्त्वाचे की? विद्यार्थ्यांची गुणवत्ता व मूल्यमापन महत्त्वाचे ? असा संतप्त सवाल पालक वर्गातून व्यक्त केला जात आहे
जि. प. शाळांच्या सहामाही परीक्षा या ९ ऑक्टोबर पासून सुरू होत असतानाच डायट प्राचार्यांकडून शिक्षकांसाठी ८ ऑक्टोबर पर्यंत मूल्यवर्धन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तसेच हे प्रशिक्षण सर्व शिक्षकांना सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे जि.प. शिक्षकांसमोर मोठा बाका प्रश्न निर्माण झाला आहे.कारण हे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रत्येक शाळेतील एक दोन शिक्षकांना किमान तीन ते चार दिवस तरी जावे लागणार आहे. आधीच प्रथम सत्राचे दिवस हे कमी असल्याने अभ्यासक्रम पूर्ण करताना शिक्षकांच्या नाकी नऊ येत आहेत. त्यात या नव्या मूल्यवर्धन प्रशिक्षणामुळे शिक्षकांसमोरील आणखी अडचणी वाढल्या आहेत.
या प्रशिक्षणा संदर्भात काही शिक्षक संघटनांनी देखील डायट प्राचार्यांची भेट घेतली होती. मात्र आपल्याला वरूनच आदेश असल्याचे सांगून शिक्षकांची बोळवण करण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी? असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे. एकतर वरिष्ठ शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे अशी अपेक्षा केली जाते. तसेच पालकांची देखील तसेच प्रकारची मागणी असते .मात्र जेव्हा विद्यार्थ्यांची गुणवत्ता त्यांचे मूल्यमापन करायचे तेव्हाच नेमके शिक्षकांना प्रशिक्षणात गुंतवले जात असल्याने शिक्षण विभागाच्या या सावळा गोंधळाबाबत पालक वर्गातून देखील तीव्र नाराजी व्यक्त होत आहे .
मूल्यवर्धन प्रशिक्षण महत्त्वाच्या आहे की विद्यार्थ्यांची गुणवत्ता व मूल्यमापन महत्त्वाचे आहे असा संतप्त सवाल देखील यामुळे पालक वर्गातून शिक्षण विभागाला केला जातो आहे. मूल्यवर्धन प्रशिक्षण हे दिवाळी सुट्टीनंतर घ्या अशी शिक्षकांची मागणी आहे .कारण हे प्रशिक्षण ८ तारखेपर्यंत चालणार असून ९ ऑक्टोबर पासून विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा आहेत. त्यामुळे या मूल्यवर्प्रधन प्रशिक्षणामुळे शिक्षणाचा खेळ खंडोबा होणार असल्याने पालकांतून तीव्रत नाराजी आणि संताप व्क्त केला जात असून शिक्षकांच्या मागणीप्रमाणे हे मूल्यवर्धन प्रशिक्षण दिवाळी सुट्टीनंतर घ्यावे अशी मागणी आता पालक वर्गातून जोर धरत आहे.








