खेडमधील लायन्स क्लबच्या स्त्री शक्ती जागर उपक्रमांतर्गत गरजू मुलींना नवीन ड्रेसचे वाटप

खेड (प्रतिनिधी) – स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने काम करणाऱ्या लायन्स क्लब ऑफ खेड सिटीने नवरात्र उत्सवानिमित्त “स्त्री शक्ती जागर” या उपक्रमाचा यशस्वी आरंभ केला. हा उपक्रम माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या संकल्पनेतून राबवला जात असून, लायन्स क्लबचे वर्तमान अध्यक्ष महेंद्र शिरगावकर यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक क्षेत्रात लोकाभिमुख उपक्रम राबवण्याचे कार्य सातत्याने चालू आहे.
या उपक्रमांतर्गत क्लबच्या सदस्यांनी खेडमधील प्रसिद्ध प्रियांका कलेक्शनचे मालक लायन प्रवीण प्रजापती यांच्या सहकार्याने एनवरे गावातील जिल्हा परिषद शाळा, तालुका खेड येथील गरजू होतकरू दोन मुलींना नवीन ड्रेसचे वाटप केले. या मुलींमध्ये कुमारी परी रुपेश चव्हाण आणि कुमारी अश्विनी सचिन कदम यांचा समावेश होता.
या सोहळ्यात एनवरे गावचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संजयराव जाधव, लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, लायन प्रवीण प्रजापती, माजी अध्यक्ष रोहन विचारे, ला. परेश चिखले, ला. संदीप मोरे आदी प्रमुख उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि सामाजिक बांधिलकीतील या योगदानाबद्दल लायन्स क्लबच्या सदस्यांचे अभिनंदन केले. हा उपक्रम खेडमधील गरजू मुलींना प्रोत्साहन देण्यासोबतच, समाजातील स्त्री शक्तीला उजागर करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरला आहे.