खेडातील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेची फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा

खेड(प्रतिनिधी)

खेड शहराजवळील भरणे येथील मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत २५ लाख रुपयांच्या कर्जापोटी गहाण ठेवलेली मिळकत पुन्हा हिच मिळकत चिपळूण येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स यांच्याकडे गहाण ठेवून मुरली मनोहर पतसंस्थेचा विश्वासघात करून २५ लाख रुपये रक्कमेची फसवणूक केल्या प्रकरणी संशयित आरोपी सुनील प्रभाकर सागवेकर (रा. समर्थनगर, भरणे, ता. खेड) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणीची फिर्याद मुरली मनोहर पतसंस्थेचे सरव्यवस्थापक अनिल भिकाजी विचले (वय -४७ वर्षे, रा. डाकबंगला खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केली. २५ लाखांचे कर्ज घेऊन या रक्कमेची फसवणूक करण्याचा हा प्रकार दि. २८ फेब्रुवारी २०१४ ते दि. ८ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडला आहे.

खेड पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित कर्जदार सुनील प्रभाकर सागवेकर याने त्याच्या मालकीची समर्थनगर भरणे येथील भूमापन क्र. ६६/ अ यामध्ये बांधलेली सिद्धीविनायक निकेतन या इमारतीतील ‘अ’ विंगमधील तळमजल्यावरील निवासी सदनिका क्रमांक ‘ए’ व सदनिका नंबर ‘ए’, सदनिका नंबर ए – ३ या मिळकती मुरली मनोहर नागरी सह‌कारी पतसंस्था यांच्याकडे गहाण ठेवलेल्या असताना याच मिळकती पुन्हा चिपळूण येथील श्रीराम सिटी युनियन फायनान्स लिमिटेड यांच्याकडे गहाण खत क्र. ११७८/२०१६ व १२१८/२०१६ प्रमाणे गहाण ठेवून मुरली मनोहर नागरी सह‌कारी पतसंस्थेचा विश्वासघात करून फसवणूक केलेली आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास येथील पोलीस करीत आहेत.