खेड (प्रतिनिधी) – ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड (रत्नागिरी) संचालित कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर (उच्च माध्यमिक विभाग) व कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर (माध्यमिक विभाग), भडगाव या शाळांतील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट क्रीडाप्रदर्शन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा संकुल, डेरवण येथे 23 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बॉल बॅडमिंटन स्पर्धेत ज्ञानदीपच्या विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली.
19 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याचबरोबर 17 वर्ष व 14 वर्ष वयोगटातील मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळवून उत्कृष्टता सिद्ध केली. विशेष म्हणजे 19 वर्ष वयोगटातील विजयी संघाची विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याचबरोबर वैयक्तिक स्तरावरही विद्यार्थिनींनी आपली क्रीडाक्षमता दाखवली. 14 वर्ष वयोगटातील मंजिरी चिखले आणि 17 वर्ष वयोगटातील मुग्धा घाग या दोघींची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशामागे पालकांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शक शिक्षक संतोष भोसले यांचे कष्ट महत्वाचे ठरले. खेळाडूंच्या या पराक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे तसेच सल्लागार मंडळाचे सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले.













