सी.बी.एस.ई. नॅशनल तायक्वॉंडो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विधी गोरे हिचे कांस्य पदक

खेड (प्रतिनिधी) –
उत्तर प्रदेशातील द न्यू अव्हेन्यू शाळेत 3 ते 7 सप्टेंबर दरम्यान झालेल्या सी.बी.एस.ई. नॅशनल तायक्वॉंडो स्पर्धेत रोटरी स्कूलच्या कु. विधी दिपक गोरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. या स्पर्धेत देशभरातून तब्बल 1200 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. कर्नाटक, गुजरात आणि मध्यप्रदेशसारख्या राज्यांतील प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विधीने हे यश मिळवले.
या स्पर्धेत रोटरी स्कूलचे एकूण चार खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये आयुष जाधव, रुद्र शिगवण आणि अर्णव गोफणे यांचा समावेश आहे. कु. विधी दिपक गोरे ही रोटरी स्कूलमध्ये इयत्ता 11 वीमध्ये शिकत असून तिला तायक्वॉंडो खेळाची विशेष आवड आहे. यापूर्वी तिने 2023 मध्ये राष्ट्रीय खेलो इंडिया तायक्वॉंडो स्पर्धेत सुवर्ण पदक आणि 2024 मध्ये रौप्य पदक पटकावले आहे. आतापर्यंतच्या चार राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदकांची कमाई केली असून महाराष्ट्र राज्य तायक्वॉंडो स्पर्धा आणि खेलो इंडिया निवड चाचणीमध्येही सुवर्ण पदक पटकावून आपले आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. विधीला या यशामागे क्रीडाशिक्षक व तायक्वॉंडो प्रशिक्षक श्री. कृणाल चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या कामगिरीमुळे रोटरी स्कूलमध्ये आनंदाचे वातावरण असून संस्थेचे चेअरमन मा. श्री. बिपीनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. भूमिता पटेल, शिक्षकवर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विधीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.