रत्नागिरी: शिर्के प्रशाला, रंजनमंदीर येथे दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी जिल्हास्तरीय शालेय योगासन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेमध्ये जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले.
मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन
या स्पर्धेचे उद्घाटन मरुधर वैष्णव समाजाचे अध्यक्ष श्री. रमेश माळी आणि श्री. कातीलाल प्रजापती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नागरी जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजेश आयरे, सेक्रेटरी श्री. किरण सनगरे आणि असोसिएशनचे सदस्य दुर्वांकुर चाळके, सौ. श्रद्धा जोशी, श्री. गौरव आंब्रे व श्री. रणवीर सर उपस्थित होते. जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून श्री. मांडवकर सर यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी योगाचे महत्त्व विषद केले.
विविध गटांत खेळाडूंची चमकदार कामगिरी
या स्पर्धेत ट्रॅडिशनल योगा, आर्टिस्टिक योगा (सिंगल व पेअर) आणि रिदमिक योगा (पेअर) अशा विविध प्रकारांमध्ये १४, १७ आणि १९ वर्षांखालील गटांत स्पर्धा घेण्यात आली.
१४ वर्षांखालील गटात मुलांमध्ये शाश्वत विश्वनाथ धुमाळ याने ट्रॅडिशनल योगात प्रथम क्रमांक पटकावला, तर मुलींमध्ये राधिका मंदार पेडणेकर हिने ट्रॅडिशनल आणि आर्टिस्टिक सिंगल अशा दोन्ही प्रकारांत बाजी मारली.
१७ वर्षांखालील गटात मुलांमध्ये प्रतीक पुरंदर पुजारी (ट्रॅडिशनल व आर्टिस्टिक सिंगल) याने तर मुलींमध्ये सलोनी अमर शिर्के (ट्रॅडिशनल व आर्टिस्टिक सिंगल) हिने उत्कृष्ट कामगिरी केली.
१९ वर्षांखालील गटात मुलांमध्ये आर्य दिनेश हरचकर (ट्रॅडिशनल) आणि मुलींमध्ये स्वराली उदय तांबे (ट्रॅडिशनल व आर्टिस्टिक सिंगल) यांनी यश मिळवले.
विभागीय स्पर्धेसाठी निवड
जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष श्री. राजेश आयरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंची निवड आता विभागीय योग स्पर्धेसाठी झाली आहे. श्री. आयरे यांनी पुढील स्पर्धेसाठी सर्व विजयी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.











