खळबळजनक! रत्नागिरीतील श्रीराम मंदिरातून सीतामाईचे दागिने लंपास

रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजारपेठेतील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात चोरीची खळबळजनक घटना घडली आहे. सोमवारी (२९ सप्टेंबर) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने सीतामाईच्या मूर्तीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हार असा एकूण १ लाख ५५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरले. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, शहर पोलिस या चोरट्याचा कसून शोध घेत आहेत.
मूर्तीवरील दागिने क्षणार्धात लंपास
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे, त्यामुळे भाविकांची वर्दळही वाढली आहे. मात्र, सोमवार सकाळी शांततेचा फायदा घेत एका अनोळखी चोरट्याने हे कृत्य केले.
सीसीटीव्ही फुटेजनुसार, लाल रंगाचे शर्ट आणि काळी फुलपॅन्ट परिधान केलेल्या एका दाढीधारी तरुणाने मंदिरात प्रवेश केला. आजूबाजूला कोणी नसल्याचे पाहून त्याने थेट गाभाऱ्यातील मूर्तीजवळ जात सीतामाईच्या गळ्यातील सोन्याचे २७.२४० ग्रॅमचे मंगळसूत्र आणि १ ग्रॅम सोन्याचा वापर करून तयार केलेला तीन पदरी हार क्षणार्धात खेचून खिशात टाकला आणि तेथून पोबारा केला.
गुन्हा दाखल, पोलिसांकडून कसून शोध
सकाळी पुजारी मंदिरात दाखल झाल्यानंतर त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी तातडीने मंदिर व्यवस्थापनाला माहिती दिली. घडल्या प्रकारानंतर मंदिर व्यवस्थापनाने तत्काळ सीसीटीव्हीची तपासणी केली असता, चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेची खबर मिळताच रत्नागिरी शहर पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीप्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची पथके गठीत करण्यात आली आहेत. शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, चोरटा लवकरच पोलिसांच्या ताब्यात असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.