बोलेरो पिकअपच्या धडकेत एकाचा मृत्यू, प्रकरण दडपले

पालांडे नामक व्यक्तीचा पत्राने तालुक्यात खळबळ

लांजा (प्रतिनिधी) साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी लांजा तालुक्याच्या पूर्व भागात घडलेल्या आणि राजकीय दबावामुळे दडपण्यात आलेले बोलेरो पिक अपच्या धडकेतील गोरगरीब व्यक्तीचे अपघाती मृत्यू प्रकरण पालांडे नामक व्यक्तीच्या पत्राने प्रकाशात आले आहे.

ही घटना लांजा तालुक्याच्या पूर्व भागातील एका गावात २० जून २०२५ रोजी घडली असल्याचे या पालांडे नामक व्यक्तीने नमूद केले आहे. अपघातात मृत्यू झालेली सदर ४५ वर्षाची व्यक्ती आपल्या घराजवळील बस स्टॉपवर उभी असताना एका बोलेरो पिकअप या चार चाकी वाहनाने रिव्हर्स घेताना त्या व्यक्तीला जोरदार धडक देत अंगावरून गाडी गेली होती त्यामुळे तो व्यक्ती जागीच मृत्यू झाला होता.

बोलेरोच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना कळल्यानंतर त्याच गावातील एका राजकीय व्यक्तीने सदरहू जखमी व्यक्तीला भांबेड येथील दवाखान्यात दाखल केले होते. परंतु त्याला मृत घोषित केले होते. मात्र अपघात होऊन देखील संबंधित राजकीय व्यक्ती यांनी हे प्रकरण राजकीय दबावातून मिटवून हा अपघात नसून त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे भासवले होते .
विशेष बाब म्हणजे ज्या शासकीय दवाखान्यात या व्यक्तीला नेण्यात आले होते त्यातील तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संबंधित मृत व्यक्तीचे शवविच्छेदन करण्याची सूचना केली होती. मात्र संबंधित राजकीय पुढाऱ्यांनी त्याला आक्षेप घेत नकार दिला होता. या राजकीय लोकांच्या धूर्त स्वभावामुळेच आज संबंधित महिला ही आपल्या पती तर
मुलगी पितृ सुखापासुन पोरकी झाली आहे.
एवढा मोठा गंभीर प्रकार घडून देखील राजकीय दबावातून हे प्रकरण जाणीवपूर्वक त्याच ठिकाणी दडपण्यात आले. या कामी त्याच गावातील राजकीय पुढाऱ्याने मोठा हस्तक्षेप केला होता. कारण सदर बोलेरो पिकअप ही गाडी त्याच्या मित्रपरिवाराशी संबंधित आहे. त्यामुळे हे प्रकरण लांजा पोलीस ठाण्यापर्यंत देखील आलेले नाही. या पालांडे नामक व्यक्तीने या पत्रात नमूद केले असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन अपघात करणारा बोलेरो पिकप चालक, मालक आणि संबंधित प्रकरण मिटवण्यासाठी खटाटोप करणारा राजकीय पुढारी मंडळी या सर्वांची कसून चौकशी करून सर्वांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील या पत्राद्वारे पालांडे नामक या व्यक्तीने केली आहे .
तसेच याबाबतचे पत्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील सादर करण्यात आले असल्याचे पालांडे नामक व्यक्तीने या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, या बाबत लांजा पोलिसांशी संपर्क साधला असता सदर घटनेबाबत आपल्याकडे कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाल्यास याची सखोल चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले.