वेत्ये सर्कल येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

​सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील वेत्ये सर्कल येथे काल (गुरुवारी) रात्रीच्या सुमारास एका हृदयद्रावक घटनेत अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका नर सांबराचा जागीच मृत्यू झाला.
​ही घटना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. जवळच्याच जंगलातून रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या एका मोठ्या वाहनाची धडक या सांबराला बसल्याचा अंदाज वन विभागाने व्यक्त केला आहे.

​अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ वन विभागाला कळवले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मात्र, वन विभागाचे कर्मचारी पोहोचण्यापूर्वीच गंभीर जखमी झालेल्या सांबराने प्राण सोडले होते.

​वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात मोठ्या वाहनाच्या धडकेमुळे झाल्याचे स्पष्ट होत आहे. घटनास्थळी वन विभागाचे कर्मचारी विजय पांचाळ, मोहन बोटुकडे, प्रविण कमळकर, तसेच जलद कृती दलाचे आणि पोलीस कर्मचारी आदींनी धाव घेतली.

​रात्री उशिरा वन विभागाने या मृत सांबराचा पंचनामा केला आणि शासकीय नियमानुसार त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महामार्गावर वन्यजीव अपघाताचे वाढते प्रमाण पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरले आहे.